Ashok Kharat Networth: स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत. बलात्काराच्या आरोपानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. गेल्या 15 वर्षांत त्याने तब्बल 200 कोटी रुपयांची मालमत्ता कमावल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
पोलिस सध्या या प्रचंड संपत्तीचा स्रोत शोधत आहेत. नाशिकमधील पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन असून तिची किंमत अंदाजे 150 कोटी रुपयांच्या घरात आहे. याशिवाय कहांडळवाडी आणि मिरगाव भागात जवळपास 45 एकर जमीन, कर्मवीर नगरमधील आलिशान बंगला, तसेच पाथर्डी आणि गौळाणे शिवारात कुटुंबीयांच्या नावावर घेतलेल्या जमिनीही त्याच्या मालमत्तेत समाविष्ट असल्याचे समोर आले आहे.
मिरगावमध्ये मंदिराच्या मागे असलेल्या भव्य फार्महाऊसची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. कॅनडा कॉर्नर परिसरात त्याचे एक कार्यालय असून त्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. याशिवाय ओझर विमानतळाजवळ आणि इतर भागांमध्येही कोट्यवधी रुपयांची जमीन असल्याचा संशय तपासात व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे मंदिर ट्रस्टशी असलेला त्याचा संबंध. अशोक खरात हा ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टशी संबंधित असल्याचे समोर आले असून या ट्रस्टची वार्षिक उलाढाल सुमारे 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
आरोप असा आहे की, या ट्रस्टच्या माध्यमातून आणि आपल्या प्रभावाचा वापर करून त्याने आर्थिक व सामाजिक जाळे मजबूत केले. शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून मिरगाव येथील मंदिराची जबाबदारी त्याने घेतली आणि हळूहळू स्वतःला प्रभावशाली धार्मिक व्यक्ती म्हणून स्थापित केले.
खरातने स्वतःबद्दल केलेले दावेही आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याने 22 वर्षे मर्चंट नेव्हीत काम केल्याचा दावा केला असून 150 हून अधिक देशांचा प्रवास केल्याचेही तो सांगत होता. स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या खरातच्या या दाव्यांची सत्यता पोलिस तपासत आहेत.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही गंभीर पुरावेही लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 58 अश्लील व्हिडिओंचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापले आहे.
खरातचा आणखी एक दावा म्हणजे त्याने विविध संस्कृतींचा अभ्यास करून कॉस्मोलॉजीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर अंकशास्त्राच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. या मार्गाने त्याने राजकीय नेते, उद्योगपती आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत आपली पोहोच निर्माण केल्याचेही सांगितले जाते.