Narhari Zirwal Net Worth Pudhari
महाराष्ट्र

Narhari Zirwal Net Worth: वादग्रस्त मंत्री नरहरी झिरवळ यांची संपत्ती आणि शिक्षण किती?

Narhari Zirwal Net Worth: वादाच्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांच्या संपत्ती आणि कारकिर्दीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 2024 च्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 2.84 कोटी रुपये आहे.

पुढारी वृत्तसेवा

Narhari Zirwal Net Worth: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे नरहरी झिरवळ. एका कथित व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

साध्या घरातून मंत्रिपदापर्यंत

नरहरी झिरवळ यांचा प्रवास सोपा नव्हता. बालपण अतिशय गरिबीत गेले. शिक्षण घेण्यासाठी शेतात मजुरी करावी लागायची. त्यांनी बारावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे महाविद्यालयातही प्रवेश घेतला, मात्र ते पदवीचे शिक्षण पूर्ण करु शकले नाहीत.

नोकरी सोडून शेतीकडे वळले

कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी दिंडोरी तहसील कार्यालयात लिपिक म्हणून काम केलं. मात्र, ही नोकरी फार काळ टिकली नाही. मन रमलं नाही म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली आणि पूर्णवेळ शेतीकडे वळले. आजही शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय मानला जातो.

राजकारणात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फेत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि दिंडोरी मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. सध्या ते महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री आहेत.

एकूण संपत्ती किती?

2024 च्या निवडणूक शपथपत्रानुसार, नरहरी झिरवळ यांची एकूण मालमत्ता सुमारे 2.84 कोटी रुपये आहे. यात रोख रक्कम, बँक ठेवी, वाहनं, सोनं आणि शेती-जमीन यांचा समावेश आहे. कर्ज वजा केल्यानंतर त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे 1.95 कोटी रुपयांपर्यंत राहते.

त्यांच्या जंगम मालमत्तेत सुमारे 83 लाख रुपयांचा समावेश असून यात महिंद्रा स्कॉर्पिओ, टोयोटा फॉर्च्युनर, सुमारे 90 ग्रॅम सोनं आणि बँक डिपॉझिट्स आहेत. तर स्थावर मालमत्ता म्हणजेच जमीन आणि इमारतींची किंमत अंदाजे 2.01 कोटी रुपये आहे.

कर्ज आणि उत्पन्नाचा स्रोत

झिरवळ यांच्यावर जवळपास 89 लाख रुपयांचं कर्ज असल्याचं शपथपत्रात नमूद आहे. हे प्रामुख्याने शेती आणि घर बांधणीशी संबंधित आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेती आहे. गेल्या काही वर्षांत त्यांची वार्षिक कमाई 20 ते 36 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

2023-24 मध्ये त्यांनी सुमारे 35 लाख रुपयांचं उत्पन्न दाखवलं आहे. त्यांच्या पत्नीचीही शेतीतून 7 ते 14 लाख रुपयांपर्यंत कमाई होते. याशिवाय आमदार आणि मंत्री म्हणून मिळणारे वेतन, भत्ते आणि शासकीय सुविधा हा अतिरिक्त उत्पन्नाचा भाग आहे.

वाद आणि चर्चा

सध्या समोर आलेल्या कथित व्हिडिओमुळे ते वादात सापडले आहेत. शासकीय निवासस्थानाचा गैरवापर केल्याचे आरोपही होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT