माझ्यावरले भ्रष्टाचाराचे आरोप आतापर्यंत एकही सिद्ध झाला नाही : अजित पवार File Photo
महाराष्ट्र

"माझा दोष एवढाच की..." : महाराष्ट्रातील जनतेसाठी अजित पवारांचा 'संदेश'!

sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : "अर्थसंकल्प सादर केल्यापासून काहींकडून मला हिणवलं जातंय. मला फक्त सांगायचंय की, माझ्‍यावर टीका करणारे लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की, ते 'राजकारण' करतात तर तुमचा दादा काम करणारा आहे. मी राजकारणात आल्यापासून पक्ष बदललेला नाही. अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. माझा दोष इतकाच मी शेतकऱ्यांचे दु:ख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला." अशा शब्‍दांमध्‍ये अजित पवार यांनी एका व्हिडिओच्या माध्यामातून आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले अजित पवार?

  • मी राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदललेला नाही.

  • मी जे काही करतो, त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो.

  • विरोधकांना राज्याच्या विकासाशी देण घेण नाही, त्यांना फक्त राजकारण करायचे आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश! असं म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून त्यांनी विरोधी पक्षावरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी 'दादाचा वादा' हा हॅशटॅग दिला आहे.

म्हणून सुरु केली 'माझी लाडकी बहीण' योजना

अजित पवार यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे, "राज्याच्या अशा प्रकारचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसमकल्पात 'माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा करण्यात आली . या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र  महिलेच्या बॅंक खात्यात दर महा १५०० जमा केले जाणार आहेत. या योजनेवर राज्य सरकार दरवर्षी ४६,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. 

युवा कार्यप्रशिक्षण योजना : १०,००० स्टायपेंड

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले,"अर्थसंकल्पात राज्यात २५ हजार नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी देखील आर्थिक तरतुद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ३०% युनिटमध्ये महिला उद्योजकांना साहाय्य केलं जाणार आहे. महिलांना पिंक ई-रिक्षा चालविण्यास सक्षम बनवलं जाणार आहे. शिवाय शाळा-कॉलेजमध्ये शिकणार्या मुलींना देखील मोफत शिक्षण दिले जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे युवा कार्यप्रशिक्षण योजना. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुण तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि सोबतच १० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिला जाईल."

जनता हाच माझा पक्ष..

तुम्ही पाहिलं असेलचं की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जातयं, काहींकडून तर या बजेटला 'लबाडाच्या घऱचं आवतान' आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जातंय. मला फक्त सांगायचंय की, या लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे.की ते 'राजकारण' करणारे आणि तुमचा दादा काम करणारा आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पार्टी बदललेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पुर्वीही जनतेचा होता आणि आजही जनतेचाच आहे.  

मोफत गॅस सिलेंडरच्या बदल्यात मला शिव्या शाप 

ज्यातील जनतेच्या सर्वांगिण विकासाचे उद्दीष्ट्य समोल ठेवून हा अर्थसंकल्प बनविण्यात आला आहे. त्यामुळे जे लोक बजेटच्या नावाने नाक मुरडत आहेत. त्यांचे चेहरे आजच नीट बघुन घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा ही तेच लोक आहेत, ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरा-दारात येवू द्यायची नाही. ही तेच लोक आहेत, ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दुर ठेवायचं आहे. मी अर्थसंकल्पात राज्यातील गोर-गरीब कुटूंबियाना बर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली, त्याबदलात मला शिव्या शाप मिळत आहेत. अशी खंतही अजित पवारांनी व्‍यक्‍त केली आहे.

माझा दोष हाच की...

अजित पवार यांनी म्हटलं आहे की, "माझा दोष इतकाच मी शेतकऱ्यांच दु:ख आणि वेदना समजुन घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात आम्ही ४४ लाख शेतकऱ्यांच वीजबील माफ केलं आहे. हे सहन होत नाही. म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलं आहे. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं. तर त्याला त्यांचा विरोध का? य़ावरुनच कोण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करतेय आणि कोण शेतकरी विरोधी आहे, हे आपल्या लक्षात आले असेलचं. काही जण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पुरेशी तरतुद नसल्याची तक्रार करत आहेत. 

काही लोक झोपलेली...

मी जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होतो, त्यावेळी ही लोक झोपलेली असावेत. आम्ही दुग्ध उत्पादकांसाठी प्रतिलीटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. या लोकांना त्याची खबरबातचं नाही. आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रुपये बोनस जाहीर केला. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला. इतक सर्व देवूनही हे लोक आम्ही काहीच न केल्याच्या बोंबा मारत आहेत. पण त्यात तथ्य नाही, असा दावाही अजित पवारांनी केला आहे.

विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे

" विरोधकांना राज्याच्या विकासाशी काही देण घेण नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे.गावगाड्यातील रस्त्यांच्या निर्मीतीसाठी, दुरुस्तीसाठी आम्ही ७ हजार ६०० कोटींचा निधी दिला. पण यांच्या पोटात दुखायला लागले आहे. गावखेड्यातील माणूस लवकर शहरात पोहचून तिथलं काम ओटपून रात्रीच्या जेवणासाठी घरी पोहचत आहे. याची व्यवस्था आम्ही करत आहे. आणि विरोधकांच्या पोटात कळा येत आहेत." असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT