पुढारी ऑनलाइन डेस्क : साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. ज्यांनी श्रद्धा सबुरी ठेवली नाही त्यांची हालत काय झाली हे आपण विधानसभा निवडणुकीत पाहिलं, महाराष्ट्रात जो महाविजय प्राप्त झाला, त्यासाठी मी उभ्या उभ्या। साष्टांग दंडवत घालतो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. शिर्डी येथे भाजपाच्या महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.या अधिवेशनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती आहे.
पुढे त्यांनी बोलताना देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचा आभार मानले. या लढाईत २४ तास अमित शाह सोबत उभे होते, लोकसभा निवडणुकीनंतर पार्टी हताश होती. कार्यकर्त्यांना कळत नव्हते की काय चुकले ज्यामुळे असा पराभव झाला. त्यानंतर अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा केला, हजारो कार्यकर्त्यांना भेटत मार्गदर्शन केले, त्यांच्या मनात विजयाची खात्री दिली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला, संपूर्ण पक्ष उभा राहिला आणि हा महाविजय खेचून आणला. त्यासाठी अमित शाह यांचे खूप खूप आभार मानतो.
भाजपात श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजलं त्यांची निवडणुकीत काही अवस्था झाली हे सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला शंभरहून अधिक जागा दिल्या गेल्या 30 वर्षात ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. महायुतीने 288 पैकी 237 जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आणि मेरिटमध्ये पास झाला. आजवरच्या सत्ताधारी पक्षाच्या संख्येचा रेकॉर्ड भाजपने तोडला आहे.
पुढे त्यांनी विरोधीपक्षावर टिका करताना फडणवीस म्हणाले काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष आणि उबाठाने राज्यात व्होट जिहाद केला, निवडणुकीत पराभव केला तरी ते शांत बसले नाहीत. पुढे त्यांनी ‘एक हैं तो सेफ हैं हे मोदींजींनी सांगितलं आणि ते निवडणुकीत खरं ठरलं. फडणवीसांनी एक हैं तो सेफ हैं चा पुनरुच्चार केला.