Daughter ends life as father gets angry
वडिलांनी रागावले म्हणून मुलीने संपवले जीवन  Pudhari File Photo
मुंबई

स्नॅपचॅट डाऊनलोड न करु दिल्यामुळे निळज्यातील तरूणीने संपवले जीवन

करण शिंदे

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : वडिलांनी स्नॅपचॅट ऍप डाऊनलोड केले म्हणून ओरड्यामुळे रागाच्या भरात राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना निळजे येथे शुक्रवारी (दि.21) घडली. मोबाईलमध्ये स्नॅपचॅट ऍप डाऊनलोड करून समाजमाध्यमांच्या नाहक संपर्कात राहू नको, त्याचा कुणीतरी दुरुपयोग करील, असा इशारा डोंबिवली जवळच्या निळजे येथे एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या वडिलांनी आपल्या 16 वर्षांच्या मुलीला दिला होता.

या संदर्भात मुलीच्या पित्याने दिलेल्या माहितीनुसार, मानपाडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिस दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपचॅटच्या माध्यमातून स्वत:चे फोटो समाजमाध्यमांवर पसरविता येतात. यातून इतर नेटकरी अशा फोटोंना आपल्या परीने पसंती देतात. हा प्रकार योग्य नसल्याने, तसेच त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पित्याने आधी आपल्या सोळा वर्षाच्या मुलीची समजूत काढली होती. स्नॅपचॅट ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नकोस, असे त्यांनी तिला सांगितले.

वडिलांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मुलीने मोबाईलमध्ये स्नॅपचॅट ऍप डाऊनलोड केले होते. ही माहिती समजल्यानंतर वडिलांनी मुलीकडे नाराजी व्यक्त करून ऍप मोबाईलमधून काढून टाकण्यास बजावले. वडिलांच्या बोलण्याने संतापलेल्या मुलीने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरातल्या बेडरूममध्ये जाऊन ओढणीच्या साह्याने सीलिंग फॅनला लटकून गळफास घेतला. रात्री उशिरा हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पालकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील अधिक तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT