मुंबई

सोलापूर : शेतकर्‍याला 2 रुपयांचा धनादेश देणार्‍या सूर्या ट्रेडिंगचा परवाना रद्द; राज्यशासनाचा दणका

मोहन कारंडे

मुंबई/सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा पोती कांदा विकल्यानंतर बोरगाव (ता. बार्शी) येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना अडत व्यापार्‍याने दोन रुपयांची पट्टी धनादेश दिला होता. याची दखल घेत संबंधित अडत व्यापार्‍याच्या सूर्या ट्रेडिंगचा थेट परवानाच राज्य शासनाने रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात 17 फेब्रुवारी रोजी शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी 512 किलो कांदा विक्रीला आणला होता. छोटा कांदा कमी प्रतीचा असतो. त्यामुळे त्याला शंभर-दीडशे रुपये भाव आहे. तर चांगल्या कांद्याला पाचशेचा भाव आहे. सूर्या ट्रेडिंगने चव्हाण यांना 512 रुपये मिळाले, पण त्यांना वाहतूक खर्चासह इतर देणी वजा करून अवघ्या दोन रुपयांचा धनादेश दिला. तो धनादेशही 8 मार्चचा होता. जो कमी प्रतीचा कांदा असतो त्यातून वाहतुकीचा खर्च कपात करता येत नाही. याबाबत 2014 साली नियम करण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सूर्या ट्रेडींगचा परवाना रद्द केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने याप्रकरणी संबंधित व्यापार्‍याचा परवाना रद्द केल्याची माहिती कांदा व्यापारी व संचालक केदार उंबरजे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून योग्य दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा शेतीतून लागावाडीचा खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. चव्हण यांना मिळणार्‍या रकमेतून अन्य खर्च वजा करून चव्हाण यांना व्यापार्‍याने चक्क 2 रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश पुढच्या 15 दिवसानंतर वठणार, असे सांगितले होते. कृषी व्यवस्थेतील या घटनेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोशल मीडियातून संपाप व्यक्त करीत राज्य शासनावर आसूड ओढला होता.

स्वाभिमानी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजारपेठेत कांद्याचे दर घसरले आहेत. घाऊक बाजारात किलोमागे पाच ते आठ रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून मोठी घसरण सुरू आहे. सरकारने शेतमालाला योग्य हमी भाव द्यावा. शेतकर्‍याची थट्टा थांबवावी; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष शेट्टी यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT