मुंबई

सेनेच्याच सोबतीमुळे महाराष्ट्रात वाढलात याची जाणीव ठेवा : खा. अरविंद सावंत

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अटलजी, अडवाणींची जुनी भाजपा हरवली आहे. आताची भाजपा ही शब्द पालटणारी आहे. परंतु, शिवसेनेने केलेल्या उपकारांची तरी जाणीव त्यांनी ठेवायला हवी. आमच्या सहकार्याने वाढलात, शिवसेना नेतृत्वाने जगवले, चालवले ते लक्षात ठेवा, अशा शब्दांत शिवसेना नेते, खा. अरविंद सावंत यांनी सोमवारी भाजपला उत्तर दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी भाजप पदाधिकार्‍यांशी बोलताना उद्घव ठाकरेंना जागा दाखवा, असे आवाहन केले. त्यास थेट उत्तर देत खा. सावंत म्हणाले, 2019 च्या निवडणुकीपूर्वी अमित शहांनी शिवसेनेला पटक देंगे, अशी भाषा केली होती. पण, निवडणुका जड जाणार असल्याचे जाणवताच पटक देंगे म्हणणारे मातोश्रीवर डोके टेकवायला आले होते.

बाळासाहेबांची करंगळी पकडून भाजप महाराष्ट्रात मोठी झाली. शिवसेना नावाच्या वटवृक्षावर वेलीप्रमाणे भाजप वाढली. आज ज्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे गोडवे भाजपवाले गातात त्यांनाच जेव्हा भाजपमधून काढण्याचा विषय आला होता तेव्हा बाळासाहेबांनी ते थांबवले. मात्र, 2014 साली लोकसभेतील यशानंतर भाजपने पलटी मारली. भाजपची ही चाल लक्षात घेऊनच 2019 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेवेळीच विधानसभेतील सत्तावाटपाची चर्चा केली होती. मात्र, भाजप सत्तापिपासू बनली आहे. प्रादेशिक पक्षांशी युती करायची आणि त्यांनाच संपवायचे यांचे धोरण असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

धोके, खोके आणि बोके – पेडणेकर भाजपा हा सत्तेसाठी कोणत्या स्थराला जाऊ शकतो हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये समोर आले आहे. दोन महिन्यापूर्वीचे राजकीय नाट्य कशासाठी झाले ते सर्व जनतेला माहीत आहे. खोके कोणी कोणाला दिले आणि धोका कुणाबद्दल झाला हे आता नव्याने सांगायची गरज नाही. कोण कोणाला धोका देतोय, कोण कोणाला खोके देतोय आणि कोण कोणाचे बोके पळवतोय हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा समाचार घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT