मुंबई

विधानसभेत दिवसभर घुमला महिलांचाच आवाज

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महिला दिनानिमित्त बुधवारी विधानसभेत इतर कामकाज बाजूला ठेवून महिला धोरणांवर सर्व महिला आमदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे दिवसभर सभागृहात महिला आमदारांचाच आवाज घुमला. काँग्रेस आमदार आणि माजी महिला व बालविकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांना सोमवारी विधानसभेत बोलताना रडूच कोसळले. आपल्या पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलांच्या नावे संपत्तीवर वारसा म्हणून नावे लावण्यासाठी मी गेली 18 वर्षे झगडत आहे. एका आमदाराला, एका माजी मंत्र्याला महिला म्हणून हक्क मिळवताना एवढा संघर्ष करावा लागत असेल, तर सामान्य महिलांचा संघर्ष किती कठीण आहे, हे सांगताना त्यांना रडू आवरता आले नाही. महिला दिनानिमित्त बुधवारी विधानसभेत इतर कामकाज बाजूला ठेवून महिला धोरणांवर सर्व महिला आमदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे दिवसभर सभागृहात महिला आमदारांचाच आवाज घुमला.

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, माझ्या यजमानांचे निधन होऊन 18 वर्षे झाली. माझ्या मुलांच्या नावे अजूनही वारसा संपत्ती झालेली नाही. मी 18 वर्षे लढते आहे. आमदार, माजी मंत्री असून, माझी ही स्थिती असेल; तर सामान्य महिलांची काय अवस्था असेल, असा सवाल त्यांनी सभागृहाला केला. हे सांगताना ठाकूर यांचा कंठ दाटून आला. त्या लगेच सावरल्या. ठाकूर यांच्या या अनुभवावर सभागृह अवाक् झाले.

बजेटवर प्रतिक्रिया घेणे टाळतात

पुरुषांपेक्षा महिलांना कमी समजले जाते. पुरुष आमदारांपेक्षा अधिक संघर्ष करून आम्ही विधानसभेत येतो. मात्र, महिला आमदारांना बोलण्याची संधी क्वचितच मिळते. हात वरती करून थकतो; पण संधी मिळत नाही. महिला आमदारांना बजेटचे काय कळते, असा समज असल्याने बजेटवर आमच्या प्रतिक्रिया घेतल्या जात नाहीत, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. या चर्चेमध्ये प्रणिती शिंदे, सरोज अहिरे, माधुरी मिसाळ, भारती लव्हेकर, गीता जैन, ऋतुजा लटके, वर्षा गायकवाड, लता सोनवणे, मंदा म्हात्रे या आमदारांनी आपली मते मांडली.

मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे दुर्दैव : पवार

महिलादिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत सरकारने अशा नराधमांवर जरब बसवावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. प्रत्येक क्षेत्रात, आपल्या माता-भगिनी, पुरुष सहकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून, काम करत आहेत. समाजाच्या विकासात योगदान देत आहेत. महिलांना एक दिवसाचे झुकते माप नको, तर रोज समान संधी मिळाली पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. आपण जर असे करू शकलो, तर जागतिक महिला दिन साजरा करणे सार्थकी लागला, असेही अजित पवार म्हणाले.

SCROLL FOR NEXT