मुंबई

विद्यापीठांनी आत्मनिर्भर बनावे; कुलगुरूंच्या बैठकीत राज्यपालांचे आवाहन

दिनेश चोरगे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल, म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प करावा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्या.

राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

महाराष्ट्र अग्रेसर राहणार : मुख्यमंत्री

विद्यापीठात होणारे संशोधन, शैक्षणिक उपक्रम, नावीन्यपूर्ण शिक्षण यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो. म्हणून कुलगुरू विद्यार्थ्यांचे खर्‍या अर्थाने पालक असतात, असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गुणवत्तेकडे लक्ष द्यावे – फडणवीस

भारतीय अर्थव्यवस्थेची पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल सुरू असून सन 2030 पर्यंत हे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यापीठ ही मोठी शक्ती आहे. त्यामुळे विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता आणि सुलभता याकडे विशेष लक्ष द्यावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरण : चंद्रकांत पाटील

विद्यापीठ, महाविद्यालय यांना येणार्‍या शैक्षणिक वर्षांपासूनच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल. येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करा, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT