नालासोपारा; पुढारी वृत्तसेवा : वसईमधील श्रद्धा वालकर हत्याप्रकरण ताजे असताना या भागात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुंबईतील हिरे व्यापारी हार्दीक शहा याने मेघा तोरवी हिचा निघून खून करुन बेडमध्ये मृतदेह टाकून तो पसार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधून रेल्वेतून ताब्यात घेतले.
तुळींज येथील ४० वर्षीय मेघा हिची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना नागदा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे. सोमवारी संध्याकाळी तुळींज येथील सीता सदन या इमारतीत मेघा शहा (४०) या महिलेचा तीन ते चार दिवसांपूर्वी हत्या करून बेडमध्ये कुजलेला मृतदेह आढळला होता. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा तिचा जोडीदार हार्दीक शहा हा फरार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी टीममधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या.
हार्दिक शहा हा मुंबईतील एका डायमंड व्यापाऱ्याचा मुलगा आहे तर मेघा ही नर्स होती. ती मूळ गुलबर्गाची (कर्नाटक) होती. मोठ्या घरची असल्याने तिच्या अपेक्षाही जास्त होत्या. तिच्या गावी एक महिना हार्दिक राहून आला होता. हार्दिकने मेघावर आतापर्यंत ४० लाखांची उधळपट्टी केली होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी हार्दिकला घरातून बाहेर काढून संबंध तोडले होते. तो त्याच्या आईकडे तिला घेवून गेला होता. मात्र समाजात नाव खराब होईल म्हणून आईने त्याला बाहेर भाड्याने राहण्याचा सल्ला दिला होता. काही दिवस आई त्याला अधून मधून पैसे पुरवत होती. मात्र आईकडून पैसे मिळायचे बंद झाल्याने आता मेघा आणि हार्दिकमध्ये दररोज भांडणे होत असत.
मेघाच्या प्रेमापोटी त्याला समाजातून बाहेर जावे लागले. असे असतानाही ती समजून घेत नव्हती. अखेर हार्दिकने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. घरातील संसार उपयोगी वस्तू विकून मेघाची टॉवेलने गळा आवळून हत्या केली आणि मेघाच्या (मोठ्या आईला) काकीला मी तुमच्या मेघाला संपवून निघालो आहे. तिचा मृतदेह पाहिजे असेल तर घेवून जावा असा संदेश पाठवला होता. त्यामुळे हा खून हार्दिकनेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
मेघाची हत्या करून हार्दिक पळून गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी तत्काळ दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, पोलीस आयुक्त अमोल मांडवे, गुन्हे शाखेचे शाहूराज रणवरे, तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेन्द्र नगरकर यांनी आपापल्या टीम रवाना केल्या. यावेळी हार्दिक हा ट्रेनने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरपीएफ ला संपर्क करून आरोपीचा फोटो पाठवून गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या जीआरपीच्या मदतीने दिल्लीला पळून जाणाऱ्या आरोपीला नागदा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. मेघाच्या हत्येमागे पैशावरून भांडण कि अन्य काही कारण होते याचा तपास तुळींज पोलीस करीत आहेत.