मुंबई

‘लव्ह जिहाद’मध्ये बेपत्ता मुलींचा शोध घेणार; विशेष पथक नेमण्याची मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी डेस्क : कुटुंबाच्या विरोधात जात श्रद्धा वालकरने आफताब पूनावालाची साथसंगत निवडली आणि त्याच आफताबने श्रद्धाच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिची हत्या करून तुकडे तुकडे केले. कुटुंबापासून दुरावलेल्या आणि 'लव्ह जिहाद'मध्ये सापडलेल्या अशा अनेक तरुणी बेपत्ता झाल्याची भीती राज्याचे महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे.

कुटुंबापासून दुरावलेल्या, आंतरधर्मीय विवाह करून बसलेल्या आणि बेपत्ता असलेल्या अशा मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नेमणार असल्याची घोषणाही लोढा यांनी केली आहे. शुक्रवारी महिला आयोगाच्या बैठकीत ते बोलत होते. आंतरधर्मीय लग्नानंतर ज्या मुलींचा आपल्या जन्मदात्या कुटुंबाशी संपर्क तुटला आहे, त्या सध्या कुठे आहेत, त्यांचे काय सुरू आहे, त्यांची आजची परिस्थिती नेमकी काय आहे याचा शोध या विशेष पथकाकडून घेतला जाईल, अशी कल्पना मांडून लोढा म्हणाले, कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध धर्माच्या बाहेर लग्न केल्यामुळे या मुलींना सासरी त्रास झाला तरी माहेरकडे तक्रार करता येत नाही. ज्याच्यासोबत त्या निघून गेल्या त्याला हे पक्के माहीत असते की, या मुलीच्या पाठीशी तिचे कुटुंब नाही. अशा एकाकी मुलींचे काय होऊ शकते हे आपण श्रद्धा वालकर प्रकरणात आता पाहत आहोत. अशा मुलींना मदत करता यावी म्हणून आपण एक विशेष पथक नेमण्याचे निर्देश दिल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT