मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये यामध्ये स्पष्ट भूमिका नाही. आश्वासनाला हरताळ फासण्यात आला असल्याचा आरोप करत सोमवारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी महासंघाने दिला आहे.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या होत्या. त्या बैठकांमध्ये राज्यातील विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर महासंघाने या बैठकीतील इतिवृत्त आणि लेखी आश्वासन देण्यात यावे या मागणीसाठी आपले काम बंद आंदोलन सुरूच ठेवले होते. शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचारी संघटनेच्या हाती सरकारकडून इतिवृत्त देण्यात आले, मात्र त्यामध्ये तीन मागण्यांचा अपवाद वगळता इतर अनेक मागण्यांवर ठोस असे कोणतेही आश्वासन नसल्याने राज्यात विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचारी संघटनांची सरकारकडून फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
आंदोलन चालू राहिले तर राज्यभरातील विद्यापीठांतील लाखो विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा आणि इतर कामकाजावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारने यासंदर्भात तातडीने तोडगा काढावा अशी मागणी आता विद्यार्थी संघटनांनीही केली आहे.