मुंबई ; चेतन ननावरे : राज्यात गेल्या सहा महिन्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघात संख्या सुमारे 25 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अपघातांसह त्यात मृत्यू पावणार्या प्रवाशांचा आकडा तब्बल 28 टक्क्यांनी वाढला आहे.
राज्यात सर्वाधिक अपघात मुंबई मध्ये झालेले असून अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू नाशिककरांचे झाले आहेत. परिणामी, राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत अपघातांच्या संख्येत सुमारे 25 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
जानेवारी ते जून 2020 या काळात राज्यात एकूण 11 हजार 481 अपघात झाले होते. त्यात जानेवारी ते जून 2021 या काळात 14 हजार 245 पर्यंत वाढ झाली आहे. अपघातांच्या संख्यसोबतच त्यात मृत्यू पावणार्यांची संख्याही यावर्षी वाढली आहे. राज्यात गेल्यावर्षी एकूण 5 हजार 209 अपघाती मृत्यू झाले होते. त्यात यंदा 6 हजार 708 इकी वाढ झाली आहे. यंदा अपघातांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांचा आकडा 10 हजारांपार गेला आहे.
गेल्यावर्षी 9 हजार 641 प्रवासी अपघातांमध्ये जखमी झाले होते. यंदा त्यांची संख्या 10 हजार 879 इतकी झाली आहे. राज्यातील फक्त तीन जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये अपघातांची संख्या वाढल्याचे दिसते. केवळ बुलढाणा, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना अपघातांची संख्या कमी करण्यात यश आले आहे.
बुलढाणामध्ये गेल्यावर्षी 233 अपघात झाले होते, त्यात यंदा 226 पर्यंत घट झाली आहे. त्यापाठोपाठ गतवर्षी ठाणे जिल्ह्यात 237 आणि पालघरमध्ये 326 अपघात झाले होते. यंदा मात्र दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे 174 आणि 232 इतकी घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, ही आकडेवारी कोरोन लॉकडाउन काळातही ठळकपणे समोर येताना दिसते.
आकडेवारीनुसार मुंबई : 956, नाशिक : 728, अहमदनगर : 675, पुणे : 674, कोल्हापूर : 514, सोलापूर : 453, नागपूर : 431, नागपूर (शहर) : 424, जळगाव : 418 आणि नांदेड : 396 हे 10 जिल्हा सर्वाधिक अपघात झालेले आहेत. त्याचवेळी नाशिक : 454, पुणे : 418, अहमदनगर : 367, जळगाव : 276, सोलापूर : 255, सातारा : 247, नागूपर (ग्रामीण) : 242, औरंगाबाद : 204, बीड : 197 आणि कोल्हापूर : 192 असे सर्वाधिक अपघाती मृत्यू होणारे 10 जिल्हे आहेत.
मुंबई मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांची संख्या 809 वरून 956 पर्यंत वाढली आहे. मात्र मृत्यू पावण्याचे प्रमाण 141वरून 131पर्यंत घटले. अपघातांमध्ये जखमी प्रमाणही 822 प्रवाशांवरून 809पर्यंत कमी झाले आहे.
मुंबईसह पालघर, ठाणे, गडचिरोली, सांगली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अपघातात मृत्यू पावण्याचे प्रमाण कमी आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई, सोलापूर (शहर) येथे अपघात जखमींची संख्या घटली आहे.