मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य पोलीस दलात सुमारे 29 हजार पदे रिक्त असल्याची माहिती गृहविभागाने उच्च न्यायालयात दिली. ही पदे 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत पदे भरण्याच्या सूचना न्यायालयाने विभागाला दिल्या आहेत. राज्यात पोलीस दलात सुमारे अधिकारी, कर्मचार्यांची मिळून तब्बल 29 हजार 401 पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे वास्तव समोर आले.
पोलीस दलातील कामकाज सुधारावे या अनुषंगाने कोपरगाव (जि.अहमदनगर) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. कोरोनामुळे या याचिकेवरील सुनावणी दोन वर्षे लांबली. नुकतीच याची सुनावणी झाली. या सुनावणीवेळी पोलीस दलातील रिक्त जागांबाबत 9 नोव्हेंबर 2022 ला राज्यसरकारला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या तारखेपर्यंत किती जागा भरल्या व उर्वरित जागा केव्हा भरणार, याची माहिती शपथपत्राद्वारे मागण्यात आली आहे. वेळेत पदोन्नती दिली जात नसल्यानेही रिक्त पदे वाढत आहेत. पोलिसांची सेवा 8 तास करावी, वाहने अद्ययावत द्या, तपासासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा तैनात करावी, पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही असावे, पोलिसांकडे इलेक्ट्रिक गन असावी, पोलीस कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध योजना असाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.