मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात भरतीच्यावेळी समुद्रात पोहण्यासाठी जाणार्या पर्यटकांना रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दल विभागाने मुंबईतील 12 समुद्र किनार्यांवर 93 जीवरक्षकांची नेमणूक केली आहे. राज्य शासनाकडून पर्यटन विभागाच्या अध्यादेशामध्ये मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 12 किनार्यांवर जीवरक्षकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली. येथील टाटा गार्डन समुद्रकिनारा खाजगी असून राजभवन समुद्रकिनार्यावर जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली नाही. तर वाळकेश्वर, वरळी, माहिम, वांद्रे ते खार, मनोरी, मार्वे येथील समुद्र किनारे असुरक्षित, खडकाळ आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू, आक्सा आणि गोराई या किनार्यांवर बाह्य संस्थेची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.
याठिकाणी असतील जीवरक्षक
गिरगाव ते दादर समुद्रकिर्यावर दोन पाळ्यांमध्ये 24 जीवरक्षकांची व 3 रजा राखीव मिळून अशा 27 जीवरक्षकांची 3 वर्षांच्या कालावधीकरिता आवश्यक उपकरणांसह नेमणूक करण्यात आली आहे.
वर्सोवा,जूहू व आक्सा या समुद्रकिनार्यांवर दोन पाळ्यांमध्ये 44 जीवरक्षकांची व 4 रजा राखीव मिळून 48 जीवरक्षकांची 3 वर्षांच्या कालावधीकरिता नियुक्ती केली आहे.
गोराई समुद्र किनार्यावर दोन पाळ्यांमध्ये 15 जीवरक्षकांची व 2 रजा राखीव मिळून 18 जीवरक्षकांची 3 वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे.