मालाड; पुढारी वृत्तसेवा : डोळे हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. डोळे नसतील तर केवळ माणूस आंधळा होत नाही, तर भविष्यावरही अंधकार पसरतो. संपूर्ण लोकसंख्येचा विचार केला तर साधारणपणे ५ ते १० टक्के मुलांमध्ये दृष्टीदोष आढळून येतो. परंतु, मुंबईतील झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लहान मुलांना चष्मे का नाहीत? असा प्रश्न फ्रान्समधून अभ्यास दौऱ्यात आलेल्या एका अवलियाला पडला. त्याने मुंबईतील गरीब मुलांसाठी आयसीयुटू फाऊंडेशन स्थापन केले. आत्तापर्यंत त्याने या गरीब मुलांना तब्बल २ लाख चष्मे निःशुल्क वाटले आहेत. त्यामुळे त्यांना आता स्पष्ट दिसत असून उपचारांअभावी डोळ्यांची होणारी हानी थांबली आहे.
या अवलियाचे नाव ख्रिस्तोफर हंटर असे आहे. सहचारिणी मोया यांची त्यांना या कामात मोलाची साथ मिळते. दोघेही मुंबई आणि फ्रान्समध्ये कालांतराने ये-जा करत असतात. २००४ मध्ये ते पहिल्यांदा अभ्यास दौऱ्यावर मुंबईत आले. यावेळी त्यांनी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या झोपडपट्टीला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, येथील एकही लहान मुलाने चष्मा घातलेला नाही. चौकशी केल्यावर त्यांना समजले की, येथील मुलांच्या डोळ्यांची कधी वैद्यकीय तपासणीच झाली नाही.
या मुलांसाठी काही तरी करण्याच्या कल्पनेने त्यांना स्वस्थ बसवत नव्हते. त्यानंतर त्यांनी आयसीयुटू या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून नेत्रचिकित्सेचे काम सुरू केले.
मुंबईतील झोपडपट्टी किंवा गरीब भागांमधील मुलांच्या दृष्टिदोषाचे निदान या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. त्यानंतर या मुलांना निःशुल्क चष्मे वाटप केले जाते. केवळ लहान मुलेच नाही तर वयस्कर माणसांच्या डोळ्यांचीही तपासणी केली जाते. त्यांनाही चष्मे दिले जातात. आवश्यकता असेल तर मोतीबिंदूचेही ऑपरेशन केले जाते. यासाठी त्यांनी धीरुभाई अंबानी शाळेची मदत घेतली आहे. शाळेची मुले त्यांना शिबिर आयोजित करण्यात मदतही करतात. ख्रिस्तोफर डॉक्टर नसल्याने तांत्रिक मदतीसाठी जुहूच्या लोट्स आय हॉस्पिटलची मदत घेतात.