मुंबई

मुंबईत 230 नमुने निघाले ओमायक्रॉनचे

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोविड जनुकीय सूत्र निर्धारण 14 व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष आले आहेत. यात 230 नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून सर्व 100 टक्के नमुने ओमायक्रॉन या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

कोविड विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण हे ऑगस्ट 2021 पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. कोविड विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणूच्या 2 किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. त्यामुळे उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होत आहे. ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. चाचण्या करण्यात आलेल्या 230 नमुन्यांमध्ये 0 ते 18 या वयोगटातील 20 नमुन्यांचा समावेश होता. यापैकी, 5 नमुने हे 0 ते 5 वर्षे या वयोगटातील, 5 नमुने 6 ते 12 वर्षे या वयोगटातील तर 10 नमुने 13 ते 18 वर्षे या वयोगटातील होते. परंतु या रुग्णांमध्ये कोविड बाधेची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. 230 बाधितांपैकी 74 जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. 19 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील तिघांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. तर एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याचे वय 43 वर्षे होते. तो मधुमेह व हृदयविकाराने त्रस्त होता.

SCROLL FOR NEXT