मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा केल्याचा आरोप करत पोलीस
तक्रार दाखल करून घेत नसल्याचा कांगावा करणार्या भाजप नेते किरीट सोमय्यां यांना दंडाधिकार्यांनी गुरुवारी चांगलेच फटकारले.
पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने तक्रार मागे घेण्यास नकार देत वकीलांऐवजी न्यायालयात हल्लाबोल करणार्या सोमय्या यांना
दंडाधिकारी हेमंत जोशी यांनी तंबी देत सांगितले की, याचिका मागे घ्या अन्यथा तुमच्या विरोधात अवमान याचिका दाखल करू.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यानेच लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंटला कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळाले यात घोटाळा झाला असून या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा दावा करत सोमय्या यांनी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश हेमंत जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली.
सोमय्या यांच्यावतीने अॅड. लक्ष्मण कनाल यांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावे अशी मागणी केली. त्यावर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांनी याची स्वतः दखल घेऊन स्युमोटो तक्रार दाखल केली आहे. आझाद नगर पोलीस
ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्या मुळे याचिका मागे घ्या, असा सल्ला दिला. मात्र सोमय्या यांनी स्वत: पुढे
येत याचिका मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कोर्टाने याचिका मागे घेण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणीही केली. सोमय्यांच्या
या युक्तिवादानंतर संतप्त झालेल्या न्यायधीशांनी सोमय्या यांना चांगलेच फटकारले. तुम्ही याचिका मागे घेता की तुमच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याचे आम्ही आदेश द्यायचे, असा सवाल केला. हा दट्ट्या बसताच सोमय्या यांची बोलतीच बंद झाली. शेवटी दंडाधिकारी न्यायालयाने सुनावणी 30 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.