मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गणेश मिरवणुका जुन्या व धोकादायक पुलावरून काढताना गणेश भक्तानो जरा सावधान… मुंबई महानगरपालिकेने 13 जुन्या व धोकादायक पूलांची यादी जाहीर केली आहे. या पुलावरून गणेश मिरवणूक काढताना गणेश भक्तांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई शहरात ब्रिटिशकालीन फुलांसह काही जुने फुल आहेत या पुलांची मोठे वजन पेलण्याची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात मुंबई महानगरपालिका गणेश भक्तांना सावधतेचा इशारा देते. गणेशोत्सवात अनेक मंडळ गणेशमूर्तीची मोठी मिरवणूक काढतात. विशेषतः विसर्जना दिवशी लाखो गणेश भक्तांसह गणेश मिरवणुकाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे एकाच वेळी धोकादायक व जुन्या पूलांवर मिरवणुका आल्यास पुलाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे खबरदारीचे उपाय योजना म्हणून पालिका नियमावली जाहीर करते.
करीरोड रेल्वे स्टेशनवरील पूल, साने गुरुजी मार्गावरील ऑर्थर रोड असणारा चिंचपोकळी रेल्वे स्टेशनवरील पूल आणि भायखळा परिसरातील रेल्वे मार्गावरील मंडलिक पूल या पूलांवर एका वेळेस भाविक व गणेश मूर्ती यांचे 16 टन पेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पूल विभागाकडून करण्यात आले आहे. अन्य जुन्या पुलावरून मिरवणूक काढतानाही गणेश भक्तांनी विशेष काळजी घ्यावी. यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश भक्तांचे मिरवणुकी दरम्यान प्रबोधन करावे, असे आवाहन पालिकेच्या रस्ते विभागाकडून करण्यात आले आहे.