मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन परिसरातील मार्गात तुंबणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने आरसीसी चेंबर बनवून पूर नियंत्रण दरवाजे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. पण हे कामही यावर्षी पूर्ण होणार नसल्यामुळे यंदाही रेल्वे स्टेशन परिसरात तुंबणाऱ्या पाण्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
मध्य रेल्वे सीएसएमटी टर्मिनसच्या बाजूने जाणाऱ्या पी. डिमेलो मार्ग आणि यलो गेट प्रवेश मार्गाच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गाच्या मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत होते.
गेल्या काही वर्षांपासून रेल्वे मार्गात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एक हजार घनमीटर प्रति तास क्षमतेचे पाणी उपसा पंप बसवण्यात येत होते. परंतु मुंबई शहरात मोठा पाऊस असेल त्याचवेळी समुद्राला मोठी भरती असेल तेव्हा मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन परिसरात दोन फूट पाणी साचते. यावर उपाय म्हणून पी.डिमेलो रोड आणि यलो गेट प्रवेश मार्ग येथे आर.सी.सी. चेंबरचे बांधकाम व पूर नियंत्रण दरवाजे आणि पंप बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसाळी पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी यलो गेट प्रवेशद्वार येथील आरसीसी चेंबरपासून ते ओएनजीसी पातमुखापर्यंत जवळपास 700 मीटर एवढ्या लांबीची 1500 मिली मीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यानुसार हे काम मार्च 2022 नंतर हाती घेण्यात आले. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आरसीसी चेंबरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे यंदाही येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पी डिमेलो मार्ग व मस्जीद बंदर रेल्वे स्टेशन परिसरातील पूर सदृश्य परिस्थिती आटोक्यात येईल, असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.