मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गावर प्रवाशांच्या जास्तीत जास्त गरजा लक्षात घेता सोयी-सुविधा पुरवल्या गेल्या आहेत. या मार्गावरील ट्रेनच्या डब्यात सायकल ठेवण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावरील स्थानकांवर जास्तीत जास्त सरकते जिनेही बसवण्यात आले आहेत. ट्रेनच्या प्रत्येक डब्यात सायकल उभी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायकल उभी करण्याच्या जागेवरील आसने ही फोल्डिंगची करण्यात आली आहेत. स्थानकालगत किंवा जवळच्या अंतरावर रा- हणाऱ्या प्रवाशांनी स्थानकाबाहेर आल्यावर खासगी वाहतुकीऐवजी सायकलचा वापर करावा, हे अभिप्रेत आहे. त्यासाठी त्यांना मेट्रोतून सायकल नेण्याची मुभा देण्यात आली आहे.
या मार्गावरील स्थानके ही उन्नत असल्याने सर्व स्थानकांवर मिळून ७० सरकते जिने बसवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात जलदगतीने जाता येईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रो ७ च्या दुसऱ्या टप्प्यात १६, तर मेट्रो २ अ मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ३२ लिफ्ट बसवण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षा आणि स्थानकावर देखरेख ठेवण्यासाठी ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील स्थानकांवर ट्रेन आणि फलाट यांच्यामध्ये काचेचे दरवाजे उभारले आहेत. ट्रेन फलाटावर थांबल्यावर आधी काचेचे दरवाजे उघडतील, त्यानंतर ट्रेनचे दरवाजे उघडतील. स्थानकात ट्रेन नसेल तेव्हा हे दरवाजे बंदच असतील. अशा प्रकारचे दरवाजे मेट्रोच्या अन्य मार्गातही उभारले जात आहेत.
या मेट्रो मार्गावर पहिल्या दिवसापासूनच तिकीट काढण्यासाठी मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी होतील. मोबाईलवर क्यू आर कोड स्कॅन केल्यावर किती जणांसाठी तिकीट हवे आहे याचा पर्याय येईल, त्यानंतर स्थानकाची निवड करावी लागेल, त्यानंतर नेट बँकिंग किंवा अन्य उपलब्ध पर्यायांपैकी जो पर्याय निवडल्यानंतर खात्यातून पैसे वळते होतील. मोबाईलवर आलेले तिकीट स्थानकाच्या आत प्रवेश करतेवेळी तेथील गेटवर स्कॅन केल्यानंतर स्थानकात प्रवेश मिळेल.