मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईत उद्याने आणि मोकळ्या जागांवर झाडे लावून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून अंधेरी, मरोळ परिसरात लवकरच मुंबईतील मोठे शहरी जंगल उभे राहणार आहे. तीन एकरवर साकारणार्या या शहरी जंगलात 139 प्रजातीची झाडे लावली जाणार आहेत.
मरोळ मिठी नदीजवळ पालिकेचे 1.9 एकरचे उद्यान आहे. या उद्यानाचा 1.3 एकर जागेत विस्तार करून हे शहरी जंगल उभारण्यात येणार आहे. पालिकेच्या नियोजन विभागातर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहरी उष्णतेच्या समस्यांवर मात करण्यासाठी शहरी जंगलामागची संकल्पना असल्याचे नियोजन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
या जंगलामध्ये इंटरप्रिटीशन सेंटर, दगडी पाथ वे, बोर्ड वॉक वे, व्हुईंग डेक, म्फिथिएटर, पक्षी पाँड, इको वॉटर ट्रिटमेंट प्लांट असणार आहे. त्याशिवाय 13,102 चौरस मीटर हिरवळीचे आच्छादन, 7,784 चौरस मीटर अंतर्गत डीपी रोड यासाठी सात कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.