मुंबई; प्रकाश साबळे : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महापालिकेतील पालिका विभाग कार्यालयातील तीन सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर 4 विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांची तीन वेळा तर किरण दिघावकर यांची दोन वेळा बदली करण्यात आली. यामुळे सरकारच्या आणि मुंबई महापालिकेच्या कारभारांविषयी सहाय्यक आयुक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 9 ऑगस्ट रोजी शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यानंतर 12 ऑगस्ट रोजी पालिका पी.उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर ऊर्फ महेश पाटील यांची उचलबांगडी करून एफ.दक्षिण विभागात पदस्थापना करण्यात आली. तर त्यांच्या ठिकाणी ई विभागात नव्याने रूजू झालेले सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच एम.पश्चिम विभागात नव्याने पदस्थापना झालेल्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांची एका महिन्यात तिसर्यांदा बदली करून त्यांची सहाय्यक आयुक्त म्हणून अतिक्रमण निष्कासन, शहर, पूर्व-पश्चिम उपनगरे विभागात नियुक्ती केली. तसेच एफ.दक्षिण विभागातून स्वप्नजा क्षीरसागर यांची ए विभागात बदली करण्यात आली. याबरोबरच कार्यकारी अभियंता अजय कुमार यादव यांच्याकडे ई विभागातील सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.
सहा.आयुक्त किरण दिघावकर : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दादरमधील जी.उत्तर विभागात सहाय्यक आयुक्त असलेले किरण दिघावकर यांची शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्या तक्रारीमुळे ई वॉर्डात बदली करण्यात आली होती. मात्र येथे त्यांना एक महिना होत नाही, तोच पुन्हा त्यांची ई वॉर्डातून मालाडमधील पी.नॉर्थ विभागात नियुक्ती करण्यात आली. त्यांची एका महिन्यामध्ये दोन वेळा बदली करण्यात आली.
सहा.आयुक्त मृदुला अंडे : दहिसर आर.उत्तर विभागात सहाय्यक आयुक्त राहिलेल्या मृदुला अंडे यांचीही सत्तांतरानंतर दीड महिन्यामध्ये तीन विभागातून बदल्यांची वारी करण्यात आली. आर.उत्तर विभागातून एन वॉर्ड, पुढे एन वॉर्डातून एम.पश्चिम विभाग आणि आता एम.पश्चिममधून अतिक्रमण निष्कासन, शहर, पूर्व-पश्चिम उपनगरे विभागात सहायक आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली.
सहा.आयुक्त महेश पाटील : मालाड पी.उत्तर विभागात वादग्रस्त ठरलेले सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर ऊर्फ महेश पाटील यांची मुंबई महापालिका आयुक्त यांनी उचलबांगडी केली. त्यांच्या कार्यकाळामध्ये समुद्र किनारी उभारण्यात आलेल्या बेकायदा चित्रीकरण स्टुडिओ, अनधिकृत बांधकामे झाली. त्याविरोध माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. यामुळे दगडखैर यांच्या बदलीची चर्चा गेल्या महिनाभरा पासून पालिका कार्यालयात सुरु होती.