मुंबई

मुंबई : पोलिस बदल्यांवरून सरकारमध्ये धुसफुस

सोनाली जाधव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
गृह विभागाने बुधवारी केलेल्या पोलिस पदोन्‍नतीमधील पाच अधिकार्‍यांच्या बदली आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. मुंबई आणि ठाण्यातील पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना पोलिस उपमहानिरीक्षकपदावर पदोन्‍नतीने बदली करताना आपल्याला विश्‍वासात घेतले नसल्याची तक्रार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आणि अवघ्या 12 तासांत मुख्यमंत्र्यांनी या पाच बदल्यांना स्थगिती दिली.

राज्यातील 39 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या बुधवारी जाहीर होताच महाविकास आघाडीतील मतभेदांना ठाणे जिल्ह्यातून तोंड फुटले. एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून, मुख्यमंत्र्यांनी स्थगित केलेल्या पाचही बदल्या ठाणे जिल्ह्याशी संबंधित आहेत. मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलिस उपायुक्‍त (गुन्हे) महेश पाटील यांची बदली अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणून मुंबई वाहतूक शाखेला करण्यातआली होती. पोलिस उपायुक्‍त राज्य गुप्‍तवार्ता विभाग राजेंद्र माने यांना ठाणे शहरात अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणून पाठवण्यात आले होते. पुणे येथील महामार्ग पोलिस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलिस आयुक्‍त प्रशासन ठाणे म्हणून जाणार होते. अँटी करप्शन ठाणे एसपी पंजाबराव उगले यांना सशस्त्र पोलिस दल मुंबईला अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणून पाठवण्यात आले होते. पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मुंबईला अप्पर पोलिस आयुक्‍त संरक्षण व सुरक्षा विभागात पाठवले गेले होते. ठाण्यात येणारे आणि ठाण्यातून जाणारे पोलिस अधिकारी आपल्याच पसंतीचे आणि नापसंतीचे असावेत, असा आग्रह शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आणि या पाचही बदल्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्थगित केल्या.

शिंदेंची नाराजी नको म्हणून…

गृह खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या सहीने होत असतात. त्यामुळे स्वपक्षीय मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा न करता संमती कशी दिली, असा प्रश्‍न शिंदे यांच्या गोटातून उपस्थित केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. ते शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहेत. त्यांची नाराजी नको म्हणून उद्धव ठाकरे यांनी 5 बदल्यांना स्थगिती दिल्याचे कळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT