नवी मुंबई; राजेंद्र पाटील : गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या सावटाखाली असलेला दिवाळी सण यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने मोकळेपणाने साजरा होत आहे. त्यामुळे इतर बाजारपेठांप्रमाणेच सराफ बाजारही यावेळी तेजीत येण्याची शक्यता नामवंत सराफ व्यापार्यांनी बोलून दाखवली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर दोन ते अडीच टन सोन्याची उलाढाल होऊ शकते. म्हणजेच, 1500 कोटी
रुपयांचे सोने खरेदी केले जाऊ शकते, असा अंदाज सराफ व्यापार्यांनी वर्तवला आहे.
राज्यात एकूण दीड लाख व्यापारी आहेत. त्यामध्ये 10 हजार मोठ्या व्यापार्यांचा समावेश आहे. यावर्षी दसर्यात मोठ्या प्रमाणात सोने
खरेदी झाली होती. दिवाळीत त्यात 10 ते 15 टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे. सध्या सराफ बाजाराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
फॅन्सी, कमी वजनाच्या दागिन्यांना अधिक मागणी असल्याचे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे मालक सुशील बाफना यांनी सांगितले. दोन वर्षांत कोरोनामुळे सराफ बाजाराकडे लोकांनी जवळपास पाठ फिरवली होती. मात्र, निर्बंध हटताच यावर्षीपासून या व्यवसायाला
पुन्हा बरकत येऊ लागल्याचे चित्र आहे.
सद्य:ास्थितीत राज्यात 70 ते 75 टक्के व्यापार होत आहे. यावर्षी जून-जुलैमध्ये सोन्याचा दर तोळ्याला 56 हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र आज तोच दर खाली येऊन 50 हजार 600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी उत्साह पाहण्यास मिळत आहे. 2020 मध्ये सोन्याचा दर तोळ्यामागे 35 हजार रुपये तर 2021 मध्ये तो 48 हजार ते 50 हजार रुपये होता. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीला चांदीच्या वस्तू, नाणी यांना मोठी मागणी असते. एरव्ही सोन्याबरोबरच हिर्यांच्या दागिन्यांनाही मोठी मागणी असते. मात्र, यावेळी तो कल काहीसा कमी झाला असून सोन्याच्या दागिन्यांकडेच ग्राहकांचा कल अधिक दिसत आहे.
सर्वसामान्य ग्राहक आपल्या बजेटनुसार कमी-अधिक तरी म्हणजे 5 ते 10 ग्रॅम सोन्याची खरेदी करतोच करतो. सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव शहराच्या सराफ बाजाराला यंदा पाडव्याच्या मुहूर्ताला मोठ्या उलाढालीची अपेक्षा आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून सराफ बाजारातील पेढ्यांनी सुवर्ण अलंकारांची मोठी रेंज उपलब्ध करून दिली आहे. पाडव्याला 15 ते 20 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता सुशील बाफना यांनी दिली.