मुंबई /विक्रोळी; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या इनोव्हा कारची बुधवारी मध्यरात्री कांजूरमार्गजवळ एका पिंपळाच्या झाडाला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जुनेद सलीम कुरेशी (26) आणि साहिल कुरेशी (18) अशी मृतांची नावे असून दोघेही कसाईवाडा, कुर्ला येथील रहिवासी आहेत. या अपघातात सात जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातात आमान अब्दुल गफार कुरेशी (19), साजिद अनिस अहेमद अन्सारी (15), शाहिद सलीम कुरेषी(18), कैफ शरीफ कुरेशी (17), शाहिद अहमद अनीस अन्सारी (17), अलीम जाकीर कुरेशी (21), आयान कुरेशी (18) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्याच्या कुरेशी नगर येथून हळदीचा कार्यक्रम संपवून अकरा जण जेवणासाठी भिवंडी येथील ढाब्यावर निघाले होते. यातील दोन जण दुचाकीवर तर, 9 जण इनोव्हा कारमध्ये होते. गाडी कांजूरमार्गजवळ आली असता भरधाव वेगात असलेल्या गाडीच्या चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाला जाऊन धडकली. बुधवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर कांजूरगाव बस थांब्याजवळ ही अपघाती घटना घडली. इनोव्हा कारचा (क्रमांक एम. एच. 02 ए. एल.5185) 26 वर्षीय कारचालक जुनेद सलीम कुरेशी याचा गाडीच्या वेगावरील ताबा सुटला.
उपचारांपूर्वीच चालक जुनेद कुरेशी आणि सहप्रवासी साहिल कुरेशी यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर, गंभीर जखमी अयात आयान हाजीम कुरेशी (18) याच्यावर फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अन्य सहा जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सरकारतर्फे याप्रकरणी फिर्याद दाखल करत कुरेशी विरोधात भादंवि आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.