मुंबई

मुंबई : एटीएममध्ये तांत्रिक बिघाड घडवून फसवणूक… मुंबई, पुणे, उस्मानाबादमध्ये टोळी सक्रिय

दिनेश चोरगे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एटीएम सेंटरमध्ये तांत्रिक बिघाड घडवून नागरिकांच्या खात्यातील रकमेवर हात साफ करणार्‍या हरीयाणामधील
एका आंतरराज्यीय टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही टोळी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, संगमनेर, दिल्ली, गुरगाव, फरिदाबादमध्ये सक्रिय होती. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. आरिफ रज्जी खान (26) आणि रशीद फिरोज खान (22) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 68 एटीएम कार्ड जप्त केली आहेत.

हरियाणातील टोळीचे हे सदस्य नेहमी वर्दळ असणारी मात्र सुरक्षा रक्षक नसणारी एटीएम सेंटर हेरत होते. अशा एटीएम सेंटरमध्ये जाऊन आपल्याजवळील एटीएम कार्डच्या माध्यमातून नागरिकांच्या खात्यातील रक्कम काढून घेत होते. हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लि. या विविध बँकांच्या एटीएम सेंटर व्यवस्थापनाचे काम करणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यांना 18 ऑक्टोबरला एटीएम सेंटरमधील
सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी करत असताना मालाडमधील एका एटीएम सेंटरमध्ये आलेल्या दोन तरुणांच्या हालचाली संशयास्पद
वाटल्या. त्यामुळे कंपनीच्या अधिकार्‍यांनी मालाड पोलिस ठाण्याच्या पोलिसांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला.

एटीएम सेंटरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले दोन्ही आरोपी हे अंधेरीमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मालाड पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून आरिफ आणि रशीद या दोघांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT