मुंबई

मुंबई : उंदराने लांबवले पाच लाखांचे दागिने!

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : चक्क उंदराने 10 तोळे सोने लांबवल्याची अविश्वसनीय घटना मुंबईतील दिंडोशी परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने उंदराचा शोध लावला आणि सोन्याने भरलेली दागिन्यांची पिशवी परत मिळविली. पिशवीतील सोन्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.

झाले असे की, दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरे कॉलनी परिसरात राहणार्‍या सुंदरी प्लानिबेल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी घरात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासाठी त्या निघाल्या. यावेळी त्यांना वाटेत एक भिक्षेकरी स्त्री आणि तिचे मूल दिसले. तेव्हा सुंदरी यांनी वडापाव असलेली पिशवी त्या मुलाला दिली आणि त्या बँकेकडे निघून गेल्या. बँकेत पोहोचल्यानंतर मुलाला दिलेल्या वडापावच्या पिशवीत सोन्याचे दागिने होते, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या लगेच बँकेतून निघाल्या आणि ज्या ठिकाणी आपल्या मुलासोबत भिक्षेकरी महिला बसली होती तिथे पोहोचल्या. पण तेथून ती महिला निघून गेली होती. यानंतर सुंदरी यांनी लगेच पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तिने सारी माहिती पोलिसांना सांगितली.

फिल्मी स्टाईलने शोध

ही माहिती मिळताच पोलिसांनी भिक्षेकरी महिलेने ज्या ठिकाणी कचरा फेकला होता, त्या कचर्‍याच्या ढिगार्‍यात पिशवी शोधण्यास सुरुवात केली. मात्र, तिथे ती पिशवी सापडली नाही. नंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता भिक्षेकरी महिला कचरा पेटीत पिशवी फेकून देताना दिसून आली. मात्र त्यानंतर ती पिशवी एक उंदीर जवळच्या नाल्यात घेऊन जात असल्याचेही पोलिसांनी पाहिले. पिशवीतील वडापावसोबत उंदराने 10 तोळे सोनेही नाल्यात नेले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कचरा गाडीजवळ असलेल्या गटारीतून सोन्याचे दागिने असलेली पिशवी बाहेर काढली आणि त्या महिलेला दागिने सोपवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT