मुंबई

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी

दिनेश चोरगे

धारावी; अरविंद कटके : धारावीतील ऑटोमोबाईल इंजिनियरने वाहनाच्या गतीवर रिचार्ज होणारे डिवाइस तयार करून सार्‍यांना अचंबित केले आहे. सध्या तंत्रज्ञान विद्युत वेगाने पुढे जात आहे. पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने काही वर्षांतच सीएनजी, पीएनजी
इंधनावर रस्त्यावर धावू लागली आहेत. आता तर इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीवर चालणारी वाहने बाजारात आली आहेत. मात्र, इंधन व चार्जिंग
बॅटरीला छेद देणारा एक नवा शोध एसएसफ्युल लेस पॉवर प्लांट प्रा. लि मध्ये काम करणार्‍या ऑटोमोबाईल इंजिनियरने लावला आहे.

कोणतेही इंधन व चार्जींग बॅटरीविना चालणारे फ्रि मोम्बिंग ऑल्टीनेटर नावाचे एक नवे डिवाइस त्याने तयार केले आहे. सर्फराज खान (63) असे वयोवृद्ध ऑटोमोबाईल इंजिनीयरचे नाव असून या प्रोजेक्टसाठी ते गेल्या 20 वर्षांपासून मेहनत घेत आहेत. खान यांनी आपले डिवाइस पेटेंट रजिस्टर केले आहे. हे पेटंटचे अधिकार विकत घेण्यासाठी काही ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या संपर्कात
आहेत. मात्र, भारतीयांसाठी ते स्वस्तात उपलब्ध व्हावे, असा त्यांचा मानस असून पेटंटचे सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.
फ्री मोम्बिंग ऑल्टीनेटर डिवाइस फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार करण्यात आले आहे. वाहन सुरू असताना ते डिवाइस ऑटोमॅटिक रिचार्ज होण्याचे काम करते. वाहन सुरू असताना चार्जिंग ठराविक क्षमतेवर जाताच हे डिवाइस ऑटोमॅटिक कट ऑफ होते.

क्षमतेच्या लेव्हलपासून चार्जिंग उतरू लागताच ते पुन्हा चार्ज होऊ लागते. परिणामी त्यामुळे वाहनधारकांना चार्जिंग स्टेशन शोधण्याची
गरज नाही. यामुळे वाहनचालकाला हजारो कि.मी. चा प्रवास खर्च शून्यावर येणार आहे

संबंधित डिवाइस बनवण्यासाठी मी गेली वीस वर्षे अथक परिश्रम घेतले आहेत. भारत प्रदूषणमुक्त करण्यासाठी माझाही काही
हातभार लागावा अशी माझी इच्छा असून हे डिवाइस इलेक्ट्रिक वाहनचालकांसाठी एक वरदान आहे. याला चार्जिंगची मुळीच आवशकता
नाही. वाहन सुरू असताना 48 व्होल्ट चार्ज होताच डिवाइस बंद होईल. आणि चार्जिंग उतरू लागताच पुन्हा सुरू होईल अशी व्यवस्था
डिव्हाइसमध्ये आहे.
– सर्फराज खान,
ऑटोमोबाईल इंजिनियर

SCROLL FOR NEXT