मुंबई : पुढारी वृत्तसेवा
अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारात चौथ्या दिवशीही सुरू राहिलेल्या आंदोलनामुळे आतापर्यंत 360 पेक्षा जास्त गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून 218 गाड्या रद्द झाल्या आहेत. मध्य रेल्वेनेदेखील शनिवारी आणि रविवारी मुंबईतून बिहारला जाणार्या चार गाड्या रद्द केल्या, तर काही गाड्यांच्या वेळेत बदल केला.
एलटीटी – पाटलीपुत्र एक्स्प्रेस, एलटीटी-जयानगर एक्स्प्रेस,एलटीटी-पटना एक्स्प्रेस आणि पुण्यावरून पुणे-दानापूर एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांतून सर्वाधिक विरोध होत आहे. आंदोलकांनी आतापर्यंत 15 रेल्वेगाड्या पेटवल्या आहेत. आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा पूर्व मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वेला बसला आहे. आंदोलनामुळे पूर्व मध्य रेल्वे 164, उत्तर पूर्व रेल्वे 34,उत्तर रेल्वे 13, मध्य रेल्वे 4 आणि पूर्वोत्तर रेल्वे 3 अशा 234 मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबईवरून बिहारला जाणार्या 12111 एलटीटी -पाटलीपुत्र एक्स्प्रेस, 11061 एलटीटी-जयानगर एक्स्प्रेस आणि 13202 एलटीटीपटना एक्स्प्रेस रद्द केल्या,तर पुण्यावरून सुटणारी 12149 पुणे-दानापूर एक्स्प्रेस रद्द केली आहे.