मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मी माझा हात 30 जूनलाच त्यांना दाखविला आहे. मी जे करतो ते दिवसाढवळ्या आणि उघडपणे करतो. तुमच्यासारखे लपूनछपून काही करत नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याही मंदिरात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आपले सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करून शिर्डीच्या साईबाबांचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सिन्नर येथे जाऊन एका ज्योतिषाला हात दाखविल्याने आणि पूजाअर्चा केल्याने शरद पवार यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
आत्मविश्वासाला धक्का लागलेले लोकच ज्योतिषाकडे जातात, अशी टीकाही शरद पवार यांनी शिंदे यांच्यावर केली होती. त्यावर पलटवार करताना, माझ्यात आत्मविश्वास होता म्हणूनच 50 आमदार आणि 13 खासदार माझ्यासोबत आले. मी जे करतो ते निधड्या छातीने करतो. मी सिन्नरला सर्वांदेखत आणि मीडिया समोर गेलो, असे शिंदे म्हणाले.
सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतबरोबरच सोलापूर आणि अक्कलकोटवर कर्नाटकचा दावा सांगितला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोम्मई यांना जशाच तसे उत्तर देताना विरोधकांनाही सुनावले. आम्ही कर्नाटकला एक इंचसुद्धा जागा जाऊ देणार नाही. राज्य सरकार त्यासाठी समर्थ आहे. मी या प्रश्नावर 40 दिवस कर्नाटकमध्ये तुरुंगवास भोगला आहे. जतचा मुद्दा 2012 चा आहे. त्यावेळी सरकार कोणाचे होते? असा सवाल शिंदे यांनी विचारला.
सीमावासीयांच्या सार्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या होत्या. मागील मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही त्या पुन्हा सुरू केल्या. सीमाप्रश्नावर तुम्ही काहीच केलेले नाही. आम्हाला तुम्ही शिकविण्याची गरज नाही.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री