मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वे वरील सीएसएमटी, दादर टर्मिनसवरील भार कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या परळ टर्मिनसला गेल्या वर्षी रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळूनही हा प्रकल्प पुढे सरकत नसल्याने हा प्रकल्प आजही कागदावरच आहे. परळ टर्मिनसकरिता वर्कशॉपची 19 एकर जागा आवश्यक आहे.
तसेच राष्ट्रीय टेक्स्टाईल महामंडळाची 6,320 चौरस मीटर आणि करी रोड स्थानकाजवळील 1927 चौरस मीटर खासगी जागा आवश्यक आहे.परंतु या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.
परळ टर्मिनसचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर-डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) गेल्या वर्षी रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. त्याला मंजुरीही मिळाली. रेल्वेच्या परळ कार्यशाळेच्या परिसरातच मेल, एक्सप्रेस गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव तयार आहे. याआधी दोन वेळा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या अहवालात काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले. त्यामुळे कोरोनाकाळात पुन्हा याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बोर्डाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार, मेल, एक्सप्रेस टर्मिनससाठी पाच प्लॅटफार्म बनवण्याचे नियोजन आहे.
त्याच्या जवळच या गाड्या उभ्या करण्यासाठी आणखी पाच स्टेबलिंग मार्गिका, तर मेल-एक्सप्रेस गाड्यांची व्यवस्थित पाहणी करून त्यात काही तांत्रिक दुरुस्ती करता यावी, यासाठी पाच पिट लाइनही आहेत. साधारण पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून 200 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च आहे. अद्याप या परळ टर्मिनसबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
142 वर्षे जुन्या वर्कशॉपवर हातोडा
परेल टर्मिनससाठी मध्य रेल्वे च्या तब्बल 142 वर्षे जुन्या परेल वर्कशॉपची जागा वापरण्यात येणार आहे. त्यासाठी 2018मध्ये या वर्कशॉपमधील 715 कर्मचार्यांची बदली बडनेरा येथे केली होती.परंतु त्यास रेल्वेतील कामगार संघटनांनी तीव्र विरोध केल्याने कर्मचार्यांची बदली टळली.
मुंबईकरांना दिलासा
परेल टर्मिनस झाल्यास दादर, लालबाग, परेल भागांतील स्थानिकांना याचा फायदा होईल. सीएसएमटीपर्यंत जाणार्या अनेक मेल-एक्सप्रेस दादर स्थानकापर्यंतच रिकाम्या होतात. सीएसएमटीपर्यंत जाणार्यांची संख्या खूपच कमी असते.
असा आहे प्रकल्प
परळ टर्मिनसच्या प्रकल्पाचा अहवाल रेल इंडिया टेक्निकल अॅण्ड इंजिनीयरिंग सर्व्हिसने (राईटस) तयार केला आहे.2018-19च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. येथून 24 डब्यांच्या लांब पल्ल्याच्या 50 मेल-एक्सप्रेस चालविण्याची योजना आहे. या टर्मिनसचे काम दोन टप्प्यात होणार आहे.
रेल्वेच्या परळ मैदानापासून टर्मिनसकडे जाण्यासाठी रस्ता बनविण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात जसा डेक आहे, तसा 150 मीटरचा डेक प्रवाशांसाठी बांधण्यात येणार आहे.याशिवाय टर्मिनसमध्ये मल्टी लेव्हल पार्किग, एलिव्हेटेड तिकिट बुकिंग खिडकी,पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.