मुंबई; पुढारी वृत्तसेवा : फॉक्सकॉन प्रकल्पाच्या अपयशाचे खापर राज्य सरकारने आमच्या नावावर फोडू नये, प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी आमच्या सरकारने शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र नवीन सरकारने त्याचा काहीच पाठपुरावा केला नाही, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आगामी दसरा मेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत ठाकरे यांनी प्रथमच फॉक्सकॉन प्रकल्पावर भाष्य केले. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला त्याला सध्याचे राज्य सरकारच जबाबदार आहे. कार्यक्रम आणि दौरे याच्या धावपळीत सरकारला या प्रस्तावावर विचार करण्यास वेळच मिळाला नसावा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले. पण सरकार बदलल्यानंतर प्रकल्प गुजरातला पळवून नेला. प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल आमची पोटदुखी नाही, पण दुःख जरूर आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ इच्छित होता. पण नव्या सरकारच्या काळात दोन अडीच महिन्यांत असे काय घडले. हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी कारणीभूत असेल तर कागदोपत्री दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत. त्यांनी असे करण्यापूर्वी प्रथम शिवसेनेचा इतिहास समजून घ्यावा. शिवसेनेच्या पिढ्यांचा अभ्यास करावा,असा सल्ला दिला.