मुंबई

पोलादपूर ते मुंबई… 10 तास ! चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बनला वाहतूक कोंडीचा

मोहन कारंडे

पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी मोठ्या संख्येने मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातून आलेल्या चाकरमान्यांनी पाच दिवसांच्या गणेश गौरींचे विसर्जन झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरु केला असून सोमवारपासून एसटी स्थानके प्रवाशांनी फुललेली दिसत आहेत. त्यातच अनेक वाहने रस्त्यावर आल्याने ठिकठिकाणी व पर्यायी रस्त्यावर असणार्‍या खड्ड्यांच्या त्रासाने वाहतूक कोंडीचा फटका गणेशभक्तांना परतीच्या प्रवास दरम्यान बसल्याने पोलादपूर ते मुंबई या 192 किमीसाठी 9 ते 10 मोजावे लागल्याची प्रतिक्रिया प्रवासी निळकंठ साने यांनी दिली.

पोलादपूर एसटी स्थानकातून मंगळवारी मुंबई-पुण्याकडे 8 पेक्षा जादा बसेस सोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे अनेक खासगी ट्रॅव्हल चार चाकी वाहनेही भरून मार्गस्थ होत होती. त्यातच कोकणातून येणार्‍या बसेस, ट्रॅव्हल्स, चारचाकी वाहने सकाळपासून मार्गस्थ होत असल्याने अरुंद रस्त्याच्या ठिकाणी तसेच खड्डे असलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. काही वाहने महामार्गालगत असणार्‍या धाबे हॉटेल येथे थांबत असल्याने मागून येणार्‍या वाहनांचा वेग मंदावत होता.

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर ते महाड हा प्रवास सुसाट होत असताना महाड ते माणगांव व पुढे इंदापूर या प्रवासादरम्यान अनेकदा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे पोलादपूर वाकणचे रहिवासी निळकंठ साने यांनी बोलताना दिली. हजारो वाहने एकाचवेळी रस्त्यावर आल्याने वाहतूक तासन्तास एकाच जागेवर वाहने अडकून पडली असल्याचे सांगत पोलादपूर ते मुंबई 192 किमीसाठी 9 तास लागल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT