मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात राजकीय बंडखोरीचे वातावरण असताना यंदाच्या मान्सूननेही जणू बहुतांश महाराष्ट्राविरुद्ध बंड पुकारले असून जून महिना संपत आला तरी पुरेसा पाऊस पडलेला नाही. परिणामी, खरिपाच्या फक्त 13 टक्केच पेरण्या झाल्या आहेत आणि मुंबईत सोमवारपासून लागू झालेली 10 टक्के पाणीकपात आणखी वाढू शकते.
पाऊस लांबल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली असून सध्या सुरू असलेल्या 10 टक्के पाणीकपातीमध्ये अजून वाढ करण्याचा विचार पालिकेचा जलअभियंता विभाग करत आहे. ही कपात 20 ते 25 टक्के असू शकते, असे सांगण्यात येत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांमध्ये अवघा 1 लाख 30 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच आहे. त्यामुळे मुंबईला पाणीटंचाईचे संकट येऊ शकते. त्यामुळेच पालिकेने संपूर्ण शहरात 10 टक्के पाणीकपात लागू करून, दररोज 380 दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यास सुरुवात केली आहे. पण तलावाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणावा तेवढा पाऊस नसल्यामुळे पाणीकपात वाढवावी लागेल, असे जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
बंडखोरीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरिपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्के म्हणजे 20 लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आली.
21 टक्के पाणीसाठा
राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, तर पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली.