मुंबई

पत्रा चाळ प्रकल्पातील 100 हून अधिक फ्लॅटचे बुकिंग बनावट

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गोरेगावातील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात विक्रीसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित मेडोज इमारतीमध्ये 100 हून अधिक फ्लॅट बनावट पद्धतीने बुक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात समोर आले आहे. या प्रकल्पाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास ईडी करत आहे.

हाउसिंग डेव्हलपमेंट इफ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) आणि पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत (पीएमसी) झालेल्या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या राकेशकुमार वाधवान आणि सारंगकुमार वाधवान कुटुंबियांसोबतच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र प्रवीण राऊत यांचा घोटाळ्यात सहभाग असल्याची ईडीला खात्री आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्यातील सुमारे 100 कोटी रुपये एचडीआयएलच्या माध्यमातून हडपल्याच्या आरोपाखाली ईडीने फेब्रुवारी महिन्यात प्रवीण राऊत अटक केली होती.

ईडीच्या तपासात काही खरेदीदारांचे पत्ते बनावट असल्याचे आढळून आले. विकासकाने नाममात्र रक्कम आकारून किंवा काहीच रक्कम न घेता डमी नावावर हे फ्लॅट बुक केल्याचे उघड झाल्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार्‍या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनकडे फ्लॅट बुक करणार्‍यांना आता ईडीने समन्स बजावले आहेत.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनसोबतचा करार रद्द करून म्हाडाने गोरेगावचा प्रकल्प ताब्यात घेतला असल्याने ईडीचा हा तपास महत्वाचा मानला जातो. म्हाडाच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने पत्राचाळचा पुनर्विकास करण्याच्या करारात फेरफार केला गेल्याचा ईडीला संशय आहे. 2010 मध्ये गुरू आशिष कंपनीच्या विकासकाने मीडोज इमारतीत फ्लॅट बुक करणार्‍यांकडून 138 कोटी रुपये वसूल केले. यापैकी काहींनी डमी नावाने तर, काहींनी केवळ नाममात्र रक्कम देत फ्लॅट बुक केले.

पत्राचाळ सोसायटी, म्हाडा आणि गुरु आशिष यांच्यातील त्रिपक्षीय कराराच्या माध्यमातून विकासकाने प्रत्येक भाडेकरूसाठी 775 चौरस फूट बिल्ट-अप एरिया फ्लॅट्स आणि 36 महिन्यांत म्हाडासाठी 3,000 पेक्षा जास्त फ्लॅट्स बांधायचे होते. त्यानंतर तो ही किंमत वसूल करण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी उर्वरित भूखंडावर खासगी इमारती बांधू शकणार होता. गुरू आशिषने प्लॉटचे वेगवेगळे भाग सात प्रभावशाली कंपन्या व प्रमुख बांधकाम व्यावसायिकांसह एफएसआयसह विकून 1 हजार 34 कोटी रुपये जमा केले आहेत.

* प्रवीण राऊत हे वाधवान यांच्यासोबत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा.लि. कंपनीमध्ये संचालक होते. या कंपनीने 2006 मध्ये गोरेगावमधील पत्राचाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. प्रकल्पातील बाधित 672 रहिवाशांना वार्‍यावर सोडत विकासकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. अंतर्गत तपासणीत या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे उघड होताच 2011 मध्ये म्हाडाने कारवाई सुरू केली. मार्च 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 2020 मध्ये एचडीआयएलचे सारंग वाधवान यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. पुढे ईडीने हा गुन्हा तपासावर घेतला.

* एचडीआयएलकडून 95 कोटी रुपये मिळाले. त, गुरु आशिषने गोळा केलेले पैसे हे प्रकल्पाचे अर्धवट बांधकाम, समूह कंपन्यांच्या कर्जाची परतफेड आणि भाडेकरूंचे भाडे भरण्यासाठी वापरण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT