मुंबई

नीती आयोग बैठकीनंतरच्या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील रांगेत

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीनंतर काढण्यात आलेल्या एकत्रित फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान मिळाल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली. दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान झाल्याचा सूर विरोधकांनी लावला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले, दुसर्‍या रांगेत उभे केले म्हणून त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला तिसर्‍या रांगेत जाऊन उभे राहावे लागत आहे. परिस्थिती किती बदलली आहे. महाराष्ट्र किती झुकला आहे हे पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनीही खोचक ट्विट केले. एकनाथ शिंदे मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

राजकारण नको : सामंत

या टीकेला शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले फोटो पाहिल्यानंतर एक लक्षात येते की, एकनाथ शिंदे हे फोटोसाठी त्या ठिकाणी उभे होते. पण या आधी राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूला पहिल्या रांगेत होते, हे कुणाला दिसले नाही हे आपले दुर्दैव आहे.

SCROLL FOR NEXT