मुंबई

निवडणूक आयोग बरखास्त करा! : उद्धव ठाकरे

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोग बरखास्त करा आणि निवडणुकीद्वारे निवडणूक आयुक्तांची निवड करावी, अशी मागणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. निवडणूक आयोगाला निर्णय आमच्याविरोधात द्यायचा होता, तर शपथपत्रे का भरून घेतली, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नव्हे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

देशात खोटारड्यांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहे, असा टोला ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह बळकावणे हा पूर्वनियोजित कट होता. ज्या निवडणूक आयुक्तांनी हा निर्णय दिला, तेच वादग्रस्त असल्याचेही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीने शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह मिळू शकले. मात्र, त्यांना ठाकरे नाव मिळणार नाही, जर आताच आवाज उठवला नाही तर येणार्‍या काळात देशातील इतर पक्षांसोबतदेखील हे होऊ शकते. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित नव्हता. त्यांनी दिलेला निकाल योग्य नाही. आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. बाहेर गेलेले सर्व आमदार घटनेनुसार अपात्र ठरवायला हवे होते. मात्र, गुंता वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने घाईत हा निर्णय घेतल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

शिंदे गटातून सुरुवातीला 16 आमदार बाहेर पडले. त्यावर आम्ही अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात तक्रार केली. यावर आधी निर्णय व्हायला हवा. तसेच निवडणूक आयोगाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो असून तिथे 'दूध का दूध आणि पानी का पानी' होईल, असा विश्वास त्यांनी केला.

SCROLL FOR NEXT