मुंबई

दिवाळीच्या मुहर्तावर वाहन खरेदीकडे ओढ … गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट वाहन नोंदणी

दिनेश चोरगे

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  राज्यात दसरा आणि दिवाळी सणासुदीच्या हंगामाच्या पाश्वर्र्भूमीवर सरलेल्या सप्टेंबरच्या आकडेवारीने वाहन उद्योग अनेक महिन्यांची मरगळ झटकून पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. यंदा दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीसोबतच वाहन खरेदी सर्वाधिक होण्याची चिन्हे आहेत. घरगुती वापरासाठी असलेल्या चारचाकींच्या मागणीमध्ये यावर्षी जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. तब्बल 1 लाख 51 हजार लोकांनी दिवाळीचा मुहूर्त साधून वाहन खरेदी करण्याचे ठरवले आहे. गतवर्षी हाच आकडा 87 हजार 862 इतका होता, तर प्रवासी वाहतुकीची वाहने खरेदी करण्यासाठी 1.42 लाख लोकांनी मागणी नोंदविली आहे. गतवर्षी 64 हजार 235 प्रवासी वाहतुकीची चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली होती.

चारचाकीबरोबरच तीनचाकी वाहनांचीही 1.20 लाख मागणी नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ही संख्या 70 हजारांच्या आसपास होती. तर दुचाकीची खरेदी विक्रमी संख्येने होण्याची शक्यता आहे. तब्बल 60 लाख 52 हजार लोकांनी आपली मागणी नोंदविली आहे. गतवर्षी ही संख्या 46 लाखांच्या आसपास पोहोचली होती.

इलेक्ट्रिक चारचाकी वाहन खरेदीकडेही लोकांचा कल वाढला आहे. राज्यात दिवाळीनिमित्त 87 हजार 719 वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहर आघाडीवर आहे. तब्बल 16,477 लोकांनी इलेक्ट्रिक चारचाकी वाहन खरेदी करायचे ठरवले आहे. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड 10,488, मुंबई 9186, नागपूर 8197, कोल्हापूर 5233, औरंगाबाद 3264, वसई 2603 आणि सांगली 2575 अशी मागणी नोंदविण्यात आली आहे.

वाहन विक्रीत 11 टक्के वाढ

वाहन विक्रेत्यांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने वाहनांच्या विक्रीत 11 टक्के वाढ नोंदवली गेल्याची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात 14 लाख 64 हजार एकूण वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात 13 लाख 19 हजार 647 वाहनांची विक्री झाली होती. ट्रॅक्टर आणि काही तीनचाकी वाहने वगळता प्रवासी, वाणिज्य वाहने आणि दुचाकी यासारख्या इतर सर्व विभागांनी सप्टेंबरमध्ये वर्षभरापूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत चांगली कामगिरी नोंदवली. सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 10 टक्क्यांनी वाढून 2 लाख 60 हजार वाहनांची विक्री झाली. सप्टेंबर 2021 मध्ये 2 लाख 37 हजार वाहने विकली गेली होती. सप्टेंबर महिन्यात 71 हजार 233 वाणिज्य वाहनांची विक्री झाली. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी याच काळात 59,927 वाहने विकली गेली होती.

'सिया'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहनांच्या तुलनेत दुचाकींच्या विक्रीतील वाढ कमी राहिली. या महिन्यात दुचाकींच्या विक्रीत 13 टक्क्यांची वाढ झाली आणि 17,35,199 दुचाकी विकल्या गेल्या, तर सप्टेंबर 2021 मध्ये 15,37,604 दुचाकी विकल्या गेल्या होत्या. मोटारसायकल विक्री गेल्या वर्षीच्या 9,48,161 वरून 18 टक्क्यांनी वाढून 11,14,667 वर पोहोचली, तर स्कुटरची विक्री 9 टक्क्यांनी वाढून 5,72,919 इतकी नोंदविण्यात आली. वाणिज्य वाहनांची विक्री जुलै-सप्टेंबर तिमाहीत 39 टक्क्यांनी वाढून 2,31,882 वाहनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत 1,66,251 वाणिज्य वाहनांची विक्री झाली होती, तर एकूण सर्व श्रेणीमधील वाहनांची तिमाहीतील विक्री 60,52,628 वर पोहोचली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT