मुंबईत पावसाचा जोर  
मुंबई

दादर-परळ भागात भूगर्भीय तलावांची शिफारस; तुंबईवर सुचवला आयआयटीने उपाय

Shambhuraj Pachindre

मुंबई : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचू नये यासाठी दादर-परळ या सखल भागात भूगर्भात पावसाचे पाणी साठविण्यासाठी तलाव बांधण्याची शिफारस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईने (आयआयटी) मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) केली आहे. रेल्वे मार्गावर पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता काय उपाययोजना राबविण्यात येतील, याचा अभ्यास करण्यासाठी एमआरव्हीसीने आयआयटी मुंबईला विचारणा केली होती. त्यानुसार आयआयटी मुंबईने आपला अहवाल एमआरव्हीसीला सादर केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांत पाणी भरते. यामुळे उपनगरीय रेल्वेची वाहतूक कोलमडते. विशेषत: दादर, लोअर परळ आणि कुर्ला परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी भरते. गेल्या पावसाळ्यात जून महिन्यात चुनाभट्टी स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 15 तास ठप्प होती. दरवर्षीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमआरव्हीसीने आयआयटी मुंबईला विचारणा केली होती. आयआयटीने आपल्या अभ्यासात पूर टाळण्यासाठी उपाय म्हणून गटार व्यवस्था आणि भूगर्भात पाणी साठवण्यासाठी तलावांची शिफारस केली आहे. आपल्या अहवालात आयआयटीने महापालिकेला पाणलोट क्षेत्रातून सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार यंत्रणा पुरवण्यास सांगितले आहे. तसेच अहवालात दादर आणि परळ दरम्यानच्या पाणलोट क्षेत्राच्या पाण्यासाठी अतिरिक्त होल्डिंग पॉन्ड सुचवले आहे, जेणेकरून पाणी साचू नये.

होल्डिंग पॉन्ड आणि पंपिंग स्टेशन यंत्रणा सध्या दादर आणि परळ भागातील फक्त 10 टक्के भागाची पूर्तता करू शकते. दादर हिंदमाता परिसरातून पुराचे पाणी सोडल्याने रेल्वे परिसरात पूरस्थिती निर्माण होते. परिणामी पुरंदरे स्टेडियममधील भूमिगत होल्डिंग पॉन्ड कायमस्वरूपी होल्डिंग पॉन्ड करण्याची शिफारस अहवालात केली आहे. याशिवाय कुर्ल्यातील ट्रॅकच्या बाजूने अतिरिक्त नाले, अद्ययावत पर्जन्यमापकांची स्थापना, सध्याच्या नाल्यांच्या रुंदीकरणाची तरतूद आणि नवीन नाल्यांचे बांधकाम सुचवण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT