मुंबई : पुढारी वृत्तसेवा
डॉ. तात्याराव लहाने यांनी लाखो नेत्र शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रियेनंतर डोळ्यावरची पट्टी काढल्यावर पहिल्यांदा जग पाहिल्यामुळे त्या व्यक्तीच्या चेहर्यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा अनेकांच्या चेहर्यांवर डॉ. लहानेंनी हास्य फुलवले आहे, असे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन समारंभात शरद पवार बोलत होते. यावेळी बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, अमित देशमुख, सुनील केदार आदी मंत्र्यांसह पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यांनी डॉ. लहाने यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. डॉ. लहाने यांनी अनेक रुग्णांना नवी दृष्टी दिली. त्यावेळी त्यांनी पैशाची अपेक्षा केली नाही. त्यांचे नवीन नेत्रालय ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. या नवीन नेत्रालयामार्फत गरजूंना दृष्टिदान करण्याचे काम डॉ. लहाने अखंडपणे करत राहतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
विलासरावांनी पाहिली लाखावी शस्त्रक्रिया
डॉ. तात्याराव लहाने यांनी आतापर्यंत पावणेदोन लाख नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांनी केलेल्या एक लाखाव्या शस्त्रक्रियेवेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख चार-पाच मंत्र्यासह रुग्णालय आले. त्यांनी ही शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटरमध्ये बसून पाहिली, अशी माहिती देशमुख यांचे पुत्र आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.