प्रवीण दरेकर,www.pudhari.news
प्रवीण दरेकर,www.pudhari.news 
मुंबई

जरांगे, तुमच्या भूमिकेला राजकीय वास येऊ लागलाय !: प्रवीण दरेकर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी उघड राजकीय भूमिका घ्यावी. मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले.

अंतरवली सराटी येथे छत्रपतींच्या पुतळ्याखाली बसणार आणि प्लॅनिंग काय करणार? तर कुणाला पाडायचे, कुणाला उभे करायचे! तुम्ही पूर्णतः राजकीय झाला असाल तर मग उघडपणे राजकीय भूमिका घ्या, असे आव्हानच दरेकरांनी जरांगे यांना दिले.

माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावर टीका करायचे कारणच नाही. त्यांचा आणि माझा कलगीतुरा नाही. पण त्यांची भाषाच राजकीय झाली आहे. जरांगे ओबीसीतून आरक्षण द्या म्हणतात. मात्र शरद पवारांना त्यांच्या भूमिकेबाबत विचारत नाही, ओबीसीतून आरक्षण द्यायला उद्धव ठाकरेंची तयारी आहे का, हे देखील विचारत नाहीत. काँग्रेसच्याही बाबतीत जरांगे मौन बाळगून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार हेच तुमचे लक्ष्य आहे की मराठ्यांचा प्रश्न हे लक्ष्य आहे, असा सवालही दरेकरांनी केला. तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसेल तर मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेही या प्रश्नावर संवेदनशील आहेत. त्यांचे मंत्री तुमच्याकडे चर्चेला येत आहेत, त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा, असेही दरेकर यांनी सुनावले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. हे आरक्षण शेवटी आम्हीच दिले. ते कोर्टात टिकविण्याची हमीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही हे सर्वांना माहीत आहे.

सगेसोयरेसंदर्भात आलेल्या हरकतींवर अभ्यास सुरू आहे. सरकार डोळे मिटून गप्प नाही. पण हा प्रश्न सुटायला नको; तर तो धगधगत राहायला पाहिजे, त्या जीवावर राजकीय पोळी भाजता येते का, हा तुमचा फोकस झाला आहे याचे आम्हाला दुःख आहे. मराठा समाजाच्या भावनांचे राजकीय दुकान मांडू नका, ही अपेक्षा आहे. बाकी आम्ही जरांगे यांच्यासोबत आहोत, त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत आम्हाला आदर आहे. पण त्यांच्यामार्फत कुणाचा अजेंडा राबविला जाऊ नये, एवढेच म्हणणे असल्याचेही दरेकरांनी नमूद केले.

उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक मराठा आरक्षण घालवले

देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. त्यांनीच मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण दिले. उद्धव ठाकरेंच्या सरकारला ते टिकवता आले नाही. कारण एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले तर मराठा समाजाची दुकानदारी करणाऱ्यांचे काय होणार? केवळ हा विचार करून मराठा समाजाचे आरक्षण उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक घालवले, असा आरोपही दरेकरांनी केला.

SCROLL FOR NEXT