मुंबई

गुटखाकिंग जोशीसह दोघांना 10 वर्षे तुरुंगवास

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी डेस्क :  गुटखाकिंग जे. एम. जोशी आणि इतर दोघांना मुंबईतील विशेष न्यायालयाने 'मोका'अंतर्गत दहा वर्षांची कैद सुनावली. जोशी याच्याशिवाय सजा ठोठावण्यात आलेले मोहम्मद फारूख आणि जमीरुद्दीन अन्सारी हे दोघे 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सहआरोपी आहेत. हे दोघे इतर गुन्ह्यांतही दोषी आढळले आहेत.

जे. एम. जोशीच्या मदतीने कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनिस या दोघांनी पाकिस्तानात गुटखा निर्मितीचा कारखाना उभारण्याचा घाट घातला होता. जे. एम. जोशी आणि आणखी एक गुटखा उत्पादक हे दोघेही व्यावसायिक भागीदार होते. मात्र व्यवहारावरून वितुष्ट निर्माण झाल्याने जोशी याने या भागीदारीतून बाहेर पडत दुसर्‍या गुटख्याची निर्मिती केली, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. जोशीला साथीला घेत पाकिस्तानात 2002 मध्ये गुटखा निर्मितीचा कारखाना उभारण्याची तयारी दाऊद इब्राहिमने केली होती. या कारखान्याचे नाव फायर गुटखा कंपनी असे निश्चित करण्यात आल्याचा दावा सीबीआयने या खटल्यादरम्यान केला. गुटख्याशी संबंधित असलेली यंत्रसामग्री पाकिस्तानमध्ये बसवण्यासाठी जोशी याने दाऊद इब्राहिमला सहकार्य केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. त्याचबरोबर जोशी याच्यावर भारतातील एका नागरिकाचे अपहरण करून त्याला दुबईमार्गे कराची येथे गुटख्याचे युनिट बसवण्यासाठी नेल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT