पनवेल : पुढारी वृत्तसेवा
बुद्धपौेर्णिमेला झालेल्या पक्षी-प्राणी गणनेत कर्नाळा पक्षी अभयारण्यात 3 रानडुक्कर आणि 3 हनुमान लंगूर आढळले. कोविड महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर 11 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही गणना करण्यात आली.
वन विभागाने 12 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या कर्नाळा अभयारण्यात पक्षी व प्राण्यांची मोजणी नुकतीच पूर्ण केली. 2018 – 19 नंतर राबवलेल्या या उपक्रमात काही प्राण्यांची नोंदणी करण्यात आणि त्यांचे अस्तित्व ट्रॅप कॅमेरात टिपण्यात यश आलेे. कोरोना महामारीमुळे 2020-21 मध्ये ही गणना झाली नव्हती.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कर्नाळा अभयारण्यात यापूर्वी प्राण्यांच्या 41 प्रजाती आढळल्या होत्या. यंदा 16 व 17 मे रोजी झालेल्या गणनेत 3 रानडुक्करांसह 3 हनुमान लंगुरांचे अस्तित्व आढळले. त्यासोबत भेकर, रातव, घुबड, मोर, जंगली मांजर आढळल्याची माहिती कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांनी दिली. या उपक्रमासाठी तीन मचाणे उभारण्यात आली होती तसेच पाणवठ्यांनजीक सहा ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते.