मुंबई

एकनाथ शिंदेंची वेळ संपली असून आमची वेळ सुरू झाली: संजय राऊत

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  आता एकनाथ शिंदेंची वेळ संपली असून आमची वेळ सुरू झाली आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेना सचिव अनिल देसाई उपस्थित होते. शिंदे यांना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याचे आवाहन केले होते, आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट बघितली. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अब हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे, असे सांगून राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. पुढची अडीच वर्षे आमचेच सरकार कायम रहाणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिंदेंना दिलेली वेळ निघून गेली आहे. लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू, असे थेट आव्हान राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.

राऊत म्हणाले, माझी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा झाली. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. आमचे महाविकास आघाडी सरकार पुढील अडीच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हादेखील सत्तेत येईल, असेही राऊत म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटर याच इमारतीमधून महाविकास आघाडीची घोषणा झाली होती. याच इमारतीत महायुतीचे बंधन बांधण्यात आले. आता याच इमारतीमधून मी सांगत आहे की, महाविकास आघाडी मजबूत आहे आणि हे सरकार पुढील अडीच वर्षे पूर्ण करेल. यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो, आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार. विधिमंडळातदेखील आम्हीच जिंकू, असेही राऊत म्हणाले.

मुंबईत येऊन सामना करा
शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत रणनीती ठरल्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आमचा सामना करायचा आहे, त्यांनी मुंबईत येऊन आमच्याशी सामना करावा, असा इशारा दिला.

SCROLL FOR NEXT