मुंबई : दीपक पवार : दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असेल आणि मच्छीवर मनसोक्त ताव मारुया, पापलेट, सुरमई, बोंबील खरेदी करुया, असा बेत करत असाल तर जरा बाजारात जाऊन बघा… माशांचे दर 200 ते 300 रुपयांनी वाढल्याचे दिसेल. आधीच दिवाळीचा बोनस संपल्याने खिसा थंड झालाय. त्यात जिभेचे चोचले पुरवायला जाल तर ते तुम्हाला परवडणार नाही. कारण, इंधन दरवाढीचा फटका माशांनाही बसला आहे. त्याचबरोबर हवामान बदल, चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे समुद्रात मासे च मिळेनासे झालेत. त्यामुळे बाजारात माल कमी असून माशांचे दर वाढल्याचे चित्र आहे.
एकीकडे व्यावसायिक एलपीजीचे वाढलेले दर, तर दुसरीकडे माशांचे वाढलेले दर अशा कात्रीत हॉटेल व्यावसायिक सापडले आहेत. त्यामुळे येणार्या काळात मेन्यूकार्डवरील डिशेसचे दर पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारले नाहीत तरच नवल. इंधन दरवाढीचा फटका मच्छीमारांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे.
खोल समुद्रात जाऊन मासेमारी करण्यासाठी इंधन लागते. मच्छीमारांना पूर्वीप्रमाणे सरकारकडून डिझेलसाठी अनुदान मिळत नाही. त्यामुळे मच्छीमारांना स्वतःच डिझेलची खरेदी करावी लागते. त्यामुळे इंधनाचा खर्च आणि इतर खर्चापोटी जेवढे पैसे खर्च होतात, त्याच्या निम्माही खर्च भरून निघत नसल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले. माशांची वाहतूक करताना मालवाहतूकदारांकडून रोड टॅक्स घेतला जात असल्याचेही ते म्हणाले.
दरवर्षी अगदी डिसेंबरपर्यंत पापलेटही मोठ्या प्रमाणावर मिळतात. परंतु, यंदा नोव्हेंबरमध्येही माशांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. यंदा ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मिळत होते. परंतु, त्यानंतर निसर्गाचे चक्र फिरले आणि अवकाळी पाऊस, वादळी वारे यांमुळे माशांनी आपली दिशा बदलली. परिणामी माशांची आवक घटल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो यांनी सांगितले.
40 हजारांचे डिझेल, 5 ते 8 हजारांचा बर्फ
इतर खर्च असे मिळून 1 लाख रुपयांचा खर्च
खर्चाच्या तुलनेत माल मिळत नसल्यामुळे नुकसान
मासे पूर्वी (आवक) आता
पापलेट 500 ते 600 किलो 150 ते 100 किलो
सुरमई 1 ते दीड टन 100 ते 200 किलो
कोलंबी 250 ते 300 किलो 60 ते 70 किलो
वाढलेले दर
मासे आधी (किलो) आता
पापलेट 1100 1400
सुरमई 300 रुपये 500 रुपये
कोलंबी 300 रुपये 400 रुपये
रावस 300 रुपये 500 रुपये
बोंबील 100 रुपये 200 रुपये
हलवा 300 रुपये 450 रुपये