मुंबई

अ‍ॅन्टिलिया प्रकरणी बनावट अहवालासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञाला दिले पाच लाख

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : अ‍ॅन्टिलिया बॉम्ब धमकी प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. मुकेश अंबानी यांच्या आलिशान प्रासादासमोर वाहनात बॉम्ब ठेवल्याची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने घेतल्याचा अहवाल देणार्‍या सायबर सुरक्षा तज्ज्ञाने केलेल्या खुलाशामुळे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

तो अहवाल अँटिलिया-अंबानी प्रकरणाशी संबंधित नसून दिल्लीतील इस्रायली दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटाबाबतचा होता; मात्र परमबीर सिंग यांच्या सूचनेनुसार त्यात फेरफार करण्यात आला. त्यासाठी त्यांनी पाच लाख रुपये दिल्याचा दावा या सायबर सुरक्षा तज्ज्ञाने केला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सादर केलेल्या 10 हजार पानी आरोपपत्राला हे निवेदन जोडण्यात आले आहे. एनआयएच्या या आरोपपत्रामुळे परमबीर आणि अ‍ॅन्टिलिया प्रकरणाचा थेट संबंध समोर आला आहे.

हा सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणतो, गुन्हे शाखेच्या एका प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात 9 मार्च 2021 रोजी मी पोलीस आयुक्त कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी मी परमबीर सिंग यांना जैश-उल-हिंद या टेलिग्राम चॅनलवर 27 फेब्रुवारीला आलेल्या एका पोस्टबाबत सांगितले. त्यात अँटिलिया बॉम्ब धमकीचा उल्लेख होता. या टेलिग्राम चॅनलशी संलग्न मोबाईल क्रमांक तिहार कारागृहाच्या आवारातून वापरला जात असल्याचे दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेलच्या तपासात उघड झाले होते. सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणून आपण तसेच नाव असलेल्या अन्य टेलिग्राम चॅनलचा मागोवा 29 जानेवारीला दिल्लीतील इस्रायली दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेपासून घेत असल्याची माहितीही मी त्यांना दिली.

त्यावर तसा लेखी अहवाल देऊ शकता का, अशी विचारणा करण्यात आली. मात्र हे काम गोपनीय असून त्याबाबत आपण दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाच्या संपर्कात आहोत. त्यामुळे लेखी अहवाल देणे अनुचित ठरेल, असे परमबीर सिंग यांना सांगितले.

तथापि, त्यांनी लेखी अहवाल देण्याचा आग्रह धरला आणि त्याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेच्या महानिरीक्षकांशी बोलणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार मी पोलीस आयुक्तालयातच बसून माझ्या लॅपटॉपवर एका परिच्छेदाचा अहवाल तयार केला. तो त्यांनी वाचला आणि जैश-उल-हिंद या टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध झालेले अँटिलिया बॉम्ब धमकीची जबाबदारी घेतल्याचे पोस्टर त्या अहवालात घुसवण्यास सांगितले. हा अहवाल एनआयएच्या महानिरीक्षकांना दाखवणार आहोत, असे ते म्हणाले. त्यानुसार मी अहवालात फेरफार करून तो मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवला, असा दावा या सायबर सुरक्षा तज्ज्ञाने केला आहे.

आग्रहाने दिले पैसे!

अहवालात फेरफार करण्याच्या सेवेबद्दल मोबदला घेतलाच पाहिजे, असे परमबीर सिंग म्हणाले आणि किती रक्कम देऊ अशी विचारणाही केली. आपली तशी अपेक्षा नसल्याचे त्यांना सांगितले; मात्र त्यांनी आग्रहच धरला आणि आपल्या स्वीय सहायकाला तीन लाख रुपये आणण्याची सूचना दिली. त्यानुसार तो रक्कम आणण्यासाठी गेला. त्यानंतर परमबीर सिंग यांनी त्याला दूरध्वनी करून पाच लाख रुपये आणण्याचा आदेश दिला. त्याने आणलेले पाच लाख रुपये मी परमबीर सिंग यांच्या समक्षच स्वीकारले, असे हा सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT