मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आरक्षण हे सर्वसामान्यांच्या विकासाचे शस्त्र आहे. ते नसल्यास काय परिणाम होतील, याची जाणीव लोकांना करून द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 'समकालीन राजकारण, आंबेडकरवादी आकलन' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपण सत्तेचे राजकारण करतो; पण त्याआधी समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच खासगी क्षेत्र टिकणेही महत्त्वाचे आहे. कारण या क्षेत्रात अधिक नोकर्या उपलब्ध आहेत. धर्मांध शक्ती वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, धार्मिकतेला हिंदुत्वाचा रंग चढवला जात आहे.
प्रा. दिलीप मंडल म्हणाले, केंद्रात 1990 मध्ये 13 महिन्यांचे सरकार असताना काही प्रमाणात का होईना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातील भारत उभा करण्यासाठी मंडल आयोगचा प्रयत्न झाला. त्यामुळे विकासापासून दूर असलेल्या ओबीसी समाजाला सरकारी नोकर्या मिळू शकल्या. त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची होती. आता ओबीसींना दिलेले आरक्षण रद्द केले जात आहे. सरकारी नोकर्यांमध्ये बाह्य स्रोतातून भरती केली जात आहे, असे प्रा. मंडल म्हणाले.
लोकभारतीचे आमदार कपिल पाटील म्हणाले, काँग्रेसने बौद्धांना सवलती दिल्या नाहीत, भारतीय घटनेच्या शिल्पकाराचा संसदेत फोटो लावला नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतरत्न' दिला नाही. केंद्रात व्ही. पी. सिंग सत्तेत आल्यानंतर या बाबींची पूर्तता करण्यात आली. अॅड. आंबेडकरांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले, अॅड. आंबेडकरांना मोठा वारसा असतानाही त्यांनी त्याचा फायदा घेतला नाही. ते संघर्षाच्या वाटेवर चालत आहेत. त्यांनी आतापर्यंत राजकारणात समन्वयवादी भूमिका बजावली आहे. म्हणून आज ना उद्या त्यांना राजकीय सत्तेचे हमखास यश मिळेल.