अवयवदान 
मुंबई

अवयवदानामध्ये महाराष्ट्राची मोठी घसरण; कोरोनाकाळामुळे बदलले चित्र

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी डेस्क : कोरोनाकाळानंतर काही गोष्टींमध्ये फरक पडलेला जाणवू लागला आहे. अवयवदानामध्ये महाराष्ट्राची घसरण झाली आहे. कोरोनाकाळापूर्वी अवयवदानामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. तो आता तिसर्‍या क्रमांकावर घसरला आहे, तर गुजरातने दुसरा क्रमांक गाठला आहे. तेलंगणा राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.

या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत महाराष्ट्रातून केवळ 52 अवयवदान केले गेले आहे. त्यात 24 पुण्यातील, तर 22 महाराष्ट्रातून केले गेले आहे. त्यानंतर नागपूर 5, तर औरंगाबाद 1 असा क्रमांक लागतो. 2019 मध्ये महाराष्ट्रातून 160 जणांचे अवयवदान केले होते. 2020 मध्ये ते 74 तर 2021 मध्ये 95 इतके होते. अवयवदान जागृती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणताही ठोस कार्यक्रम आखला नसल्याने ही घसरण झाल्याची वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेलंगणाने यावर्षी 119 अवयवदान केले आहे. कारोना काळात तेलंगणा महाराष्ट्राच्या मागे होता. गुजरातने यावर्षी 98 जणांचे अवयवदान केले आहे. 2021 मध्ये 70, तर 2020 मध्ये 36 जणांनी या राज्यात अवयवदान केले होते.

विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे अध्यक्ष एस.के. माथूर यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील बहुतेक खासगी रुग्णालयांतून होणारे अवयवदान थांबले आहे, तर सरकारी रुग्णालयांमध्ये अजूनही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याने तेथे अवयवदान करण्यास कुणी फारसे इच्छुक दिसत नाही. या समितीने सर्व रुग्णालयांना अवयव दानाबद्दल जागृती करण्याची विनंती केली आहे.मुंबईमध्ये तीन हजारहून अधिक रुग्ण किडणीच्या प्रतीक्षेत आहेत, तर तीनशेहून अधिक जणांना यकृताची गरज आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अवयवदान जागृतीसाठी समाजमाध्यमातून जागृती करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली. गेल्यावर्षी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अवयवदान जागृती होण्यासाठी कृती समितीची स्थापना केली होती. तसेच त्यांनी विविध रुग्णालयांमध्ये विद्यार्थी डॉक्टरांशी संवाद साधला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT