मुंबई

अरुणाचलच्या सीमा तिबेटसोबत, चीनशी नव्हे : मुख्यमंत्री पेमा खांडू

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  अरुणाचल प्रदेशच्या आणि पर्यायाने भारताच्या सीमा या चीनबसोबत नव्हे, तर तिबेटशी जोडल्या गेल्या आहेत. चीनने कितीही आकांडतांडव केले तरी हे वास्तव बदलू शकत नाही, असा स्पष्ट इशारा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गुरुवारी मुंबईत 'माय होम इंडिया' या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात दिला.

माय होम इंडिया या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा 'वन इंडिया' पुरस्कार यंदा अरुणाचल प्रदेश विकास परिषदेचे प्रमुख तेचि गुबिन यांना प्रदान करण्यात आला. यंदाचे पुरस्काराचे हे 12 वे वर्ष आहे. दादर, येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात आयोजित या पुरस्कार सोहळ्यात अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, माय होम इंडियाचे संस्थापक आणि भाजप नेते सुनील देवधर, राष्ट्रीय शेअर बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरिष शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री खांडू म्हणाले की, तवांगमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीचा मुद्दा सध्या देशात चर्चिला जात आहे. तवांगमधील यांगसी सेक्टरमध्ये घुसखोरी झाल्याचा दावा केला जात आहे तिथला मी स्थानिक आमदार आहे. सीमेवर सामान्य स्थिती असून भारतीय सैन्याने आपली कामगिरी चोख बजावली आहे. हा 1962 चा भारत नाही तर 2022 चा मोदींचा भारत आहे. याच यांगसी सेक्टरमध्ये पूर्वी भारताचा एक मेजर आणि त्याचे 60 जवान तैनात असायचे. रस्ते, वाहने नसायची. पण आता सीमेवरील अशा संवेदनशील भागात एक-एक हजार सैनिकांच्या बटालियन तैनात असतात.

स्वातंत्र्यानंतर देशाचा, राज्यांचा खरा इतिहास, परंपरा नव्या पिढीसमोर मांडला गेला नाही. त्यामुळे विविध भागात एक भावनिक अंतर जाणवते. याच भावनिक अंतरामुळे पूर्वोत्तर राज्यातून येणार्‍यांना चिनी म्हणून हिणवले जाते तर इकडून तिकडे जाणार्‍यांना वेगळ्या नजरेने पाहिले जाते. हे अंतर कमी करण्यासाठी खरा इतिहास, स्थानिक परंपरा, श्रद्धा नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्री खांडू म्हणाले.

महाराष्ट्राने एका अर्थाने पूर्वोत्तर राज्यांनाच दत्तक घेतल्याची भावना पुरस्कारार्थी तेचि गुबिन यांनी व्यक्त केली. अरुणाचल प्रदेशसह पूर्वोत्तर राज्यातील गोरगरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे मोठे काम महाराष्ट्रातील कुटुंबांनी केले आहे. या दत्तक मुलांना शिक्षित करून परत आपल्या मूळ राज्यात पाठविण्याचे हे कार्य खूप मोठे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पत्नीसाठी पुरस्काराचे मानकरी बनले फोटोग्राफर

12 व्या वन इंडिया पुरस्काराचे मानकरी तेचि गुबिन यांच्या पत्नी तेचियान यांचा अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. पौडवाल यांच्या हस्ते होणार्‍या आपल्या पत्नीचा सत्कार मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह गुबिन यांना आवरता आला नाही. सभागृहाची भीड न बाळगता व्यासपीठावरच त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये पत्नीचा सत्कार सोहळा टिपला. त्यांच्या या उत्स्फूर्त फोटोग्राफीला सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.

पेमा खांडू यांचे अरुणाचली ऑरगॅनिक संत्रे

पाहुणे म्हणून आलेल्यांचा सत्कार सर्वच कार्यक्रमात होतो. परंतु, आज अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार केला. त्यासाठी त्यांनी थेट आपल्या राज्यातून पाच पाच किलो ऑरगॅनिक संत्र्याच्या थैल्याच आणल्या होत्या. आपल्या राज्यातील संत्र्याच्या ब्रँडिंगसाठी मुख्यमंत्री खांडू यांच्या या प्रयत्नाचे उपस्थितांनी चांगलेच कौतुक केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT